सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

0

पुणे (प्रतिनिधी)- हडपसर परिसरात गुन्हेगारीक्षेत्रात बस्तान बसविण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराचा अज्ञात तरुणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने भोसकून भरदिवसा निर्घृण खून केला. रविवारी दुपारी शनिमंदीर चौक, गोंधळेनगर येथे ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून ही खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, अज्ञात आरोपींविरुद्ध हडपसर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनानंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. दरम्यान, कात्रज भागातही अनैतिक संबंधाच्या संशयातून शोरुमच्या सुरक्षा रक्षकाचा निर्घृण खून करण्यात आला. त्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवसांत दोन खून झाल्याने पुणे हादरून गेले होते.

नगरमधील तडिपार गुंडाची हडपसर भागात गुंडगिरी
हडपसर भागात सुजीत वर्मा हा 22 वर्षीय तरुण काही दिवसांपासून गुंडगिरी करत होता, अशी माहिती हाती आली आहे. याच गुंडगिरीच्या प्रकारातून अज्ञान हल्लेखोरांनी रविवारी भरदुपारी त्याची भोसकून हत्या केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुजीत हा गोंधळेनगर येथून सासवड रोडच्या दिशेने दुचाकीवर जात असताना शनीमंदिर चौकाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे जखमी झालेला सुजीत जागीच कोसळला. त्याचवेळी सुजीतसोबत एक महिलादेखील प्रवास करत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली असल्याने पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत. सुजीत हा अहमदनगर येथील रहिवासी असून, तेथे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला तडिपार करण्यात आले होते. सध्या तो हडपसर परिसरात राहत होता. मांजरी, हडपसर अशा परिसरातील तरूणांना सोबत घेऊन गुन्हेगारी क्षेत्रात बस्तान बनविण्यासाठी सुजीत छोटेमोठे गुन्हे करीत होता. त्याच्या विरूध्द यापूर्वी हडपसर पोलिस ठाण्यातही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कात्रज बोगद्याजवळ आढळला मृतदेह
दुसरीकडे, कात्रज परिसरातही एका शोरुमच्या सुरक्षा रक्षकाचा निर्घृण खून करण्यात आला. आरिफ पठाण (वय 45) असे मृतकाचे नाव आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. एक तरुण या बोगद्याजवळून जात असताना त्याला पठाण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, त्याने ही माहिती पोलिसांना दिली. हा खून अनैतिक संबंधाच्या प्रकारातून झाल्याचा संशय भारती विद्यापीठ पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.