सराईत गुन्हेगाराचा राडा; तलवारीच्या धाकाने दुकानात तोडफोड

0

पिंपरी : सराईत गुन्हेगाराने तलवारीचा धाक दाखवून दुकानदाराकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने दुकानातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी लिंक रोड, चिंचवड येथील एका किराणा दुकानात घडली. आकाश उर्फ कपाळ्या राजू काळे (वय 28, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) आणि त्याचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी गिरीश ईश्‍वरलाल धनवानी (वय 29, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनवानी यांचे लिंकरोड, चिंचवड येथे श्रीकृष्ण प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी कपाळ्या आणि त्याचा एक साथीदार धनवानी यांच्या दुकानात आला. त्याने दुकानात येऊन मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ करत धनवानी यांना तलवारीचा धाक दाखवत दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र धनवानी यांनी पैसे देण्यास नकार दिला.आरोपी कपाळ्या आणि त्याच्या साथीदाराने दुकानातील साहित्याची नासधूस केली. ‘आज याकपाळ्या भाईला कोण अडवतो तेच पाहतो. जो कपाळ्याला नडल, त्याला तलवारीने तोडल’, असे मोठ्याने बोलून शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. त्याच्या दहशतीमुळे रस्त्यावर असलेल्या नागरिकांची पळापळ झाली. तसेच आसपासच्या दुकानदारांनी व सोसायटीतील नागरिकांनी गेट बंद केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.