जळगाव । मोबाईल, लॅपटॉप व दुचाकी चोरी करणार्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपड्यातून अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, 11 मोबाईल, 3 लॅपटॉप व एक संगणक असा लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपड्यातून या दोन चोरट्यांना अटक केली. दरम्यान, या वस्तु अट्टल चोरटा समीष वेसता पावरा (रा.वडला, जि.बडवाणी) याचे चोरुन आपल्याकडे दिल्या असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगीतले आहे. परंतू, पावरा हा गेल्या 11 महिन्यांपासून घरफोडीच्या एका गुन्ह्यात उप कारागृहात आहे. त्याने वर्षभरापूर्वीच या चोर्या केल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या दोघांनी दिली आहे. या दोघांकडून (एमपी 46 एमसी 4810) व (एमएच 12 जेडी 7466) या क्रमांकाच्या दोन दुचाकी मिळुन आल्या आहेत. या दुचाकी चोरीस गेल्याचे गुन्हे शिरपुर व कोरगाव पार्क (पुणे) या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहे. त्या अनुशंगाने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना शिरपुर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.