सराव सामन्यात भारतीय महिलांचा पराभव

0

डॅन बॉश । भारतीय महिला हॉकी संघाला युरोप दौर्‍यातील लेडिज डॅन बॉश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात 1-0 असा पराभव पत्करायला लागला. लेडिज डॅन बॉश संघात नेदरलॅडच्या राष्ट्रीय संघातील नऊ खेळाडूंचा समावेश होता. या स्थानिक संघाने पहिल्या क्वार्टरमधील तिसर्‍या मिनीटालाच पेनल्टी कॉर्नर मिळवून भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते.

सामन्यात यजमान संघाने अनेकदा आक्रमक चाली रचत आघाडी मिळवण्याचे प्रयत्न केले. पण भारताची गोलकिपर रजनी एटीमार्पूने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. रजनीने 17 व्या मिनीटाल आणखी एक पेनल्टी कॉर्नर फोल ठरवल्याने दुसर्‍या क्वार्टरमध्येही गोलफलक कोरा होता. वंदना कटारीया आणि कर्णधार राणीने काही चांगल्या चाली रचल्या. याप्रयत्नात दोन वेळा त्यांनी गोलपोस्टपर्यंत धडक मारली होती. पण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकिपरने त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरू दिले नाही.लेडिज डॅन बॉश संघाने 33 व्या मिनीटाला आघाडी मिळवली. लिएके हुल्सकेनने रजनीच्या जागी गोलकिपींग करणार्‍या सविताला चकवून हा गोल केला. त्यानंतर आपला बचाव भक्कम ठेवत यजमान संघाने भारतीय संघाल गोल करण्याची संधी मिळू दिली नाही.