नंदुरबार । जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रोषमाळ ग्रामपंचायतअंतर्गत गोराडी व नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत सरी येथे सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांच्या श्रमदानाने वनराई बंधारे बांधण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
वृक्षलागवडीबाबत मार्गदर्शन
वनराई बंधार्याद्वारे जलव्यवस्थापन करण्यात येणार असून या दोन्ही गावातील वैयक्तिक वनहक्क दावेदारांसाठी आयोजित शिबीरात दावा दाखल करतांना वैयक्तिक दावेदांराना योग्य ते पुरावे सादर करणे, दावा अर्ज विहित नमुन्यात सादर करणे, प्रपत्र-12 अ पडताळणी बाबत मार्गदर्शन, सामूहिक वनहक्क मिळालेल्या जागेवर आगामी पावसाळयात बांबू, तेंदुपत्ता, आंबा, सिताफळ इत्यादी प्रकारचे वृक्ष लागवड करणे, प्रत्येक वैयक्तिक वनहक्क दावेदाराच्या जमिनीवर किमान 10 वृक्ष लागवड करणे आदिबाबत जिल्हा वनहक्क व्यवस्थापक दिग्विजय परदेशी यांनी मार्गदर्शन केले. गोराडीचे ता.अक्राणी या गावात बनविण्यात आलेल्या वनराई बंधार्यातून ग्रामस्थांनी विद्यूत व सैार सुविधा नसतांना पारंपारीक पध्दतीने पाईप लाईन मार्फत साठविलेले पाणी दोन व तीन किमी पर्यंत डोंगराळ भागातून घेऊन शेती, जनावरे व लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना पाणी देणेसाठी केला आहे. या कार्यक्रमांस सरी व गोराडी दोन्ही गावांचे सरपंच, ग्रामसेवक, वनपाल, वनहक्क समिती अध्यक्ष, सचिव जिल्हाधिकारी कार्यालयातील वनहक्क शाखेतील रामचंद्र तडवी, महेंद्र गावीत, योगेश गावीत, तालुका वनहक्क व्यवस्थापक प्रकाश गावित, प्रविण गावीत, हर्षल सेानार, अशोक पवार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.