सर्जिकल स्ट्राईकमधील पाच ‘हिरो’ काश्मीरमध्ये शहीद; पाच दहशतवादीही ठार

0

नवी दिल्ली – काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी हा प्रयत्न उधळून लावला. घुसखोरी करणार्‍या पाच दहशतवाद्यांना ठार करतानाच स्पेशल फोर्सच्या पाच जवानांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे सर्व जवान चर्चित ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभागी झालेल्या ४ पॅराशूट रेजिमेंटचा एक भाग होते, अशी माहिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.
१० हजार फूट उंचीवर स्पेशल फोर्स आणि दहशतवाद्यांमध्ये ही लढाई झाली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या लढाईत दोन तीन जवान जागीच शहीद झाले तर दोन जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना एअरलिफ्ट करून तत्काळ मिलिट्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु, त्यांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. त्यामुळे एकूण पाच जवानांना गमावावे लागले. १ एप्रिल रोजी पहिल्यांदा दहशतवाद्यांच्या पावलांचे ठसे सुरक्षा यंत्रणेला आढळून आले होते. केरन सेक्टरमध्ये एका मानवरहीत व्हेईकलच्या माध्यमातून घुसखोरीचा हा प्रयत्न सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात आला होता. त्यानंतर ४ एप्रिल रोजी हे ऑपरेशन राबवण्यात आले. सध्या या भागात प्रचंड बर्फवृष्टी सुरू असल्याने रेग्युलर आर्मी युनिटला इथपर्यंत पाठवण्यात काही समस्या येत असल्याने ४ पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्सने हे आव्हान आपल्या खांद्यावर घेतले. यासाठी दोन स्पेशल युनिटचे दोन स्क्वॉडस् तैनात करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुबेदार संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील स्क्वॉडने दहशतावद्यांचे पावलांचे ठसे ओळखून त्यांचा पाठलाग केला. या स्क्वॉडमध्ये हवालदार देवेंद्र सिंह, पॅराट्रुपर बालक्रिश्नन, पॅराट्रुपर अमित कुमार आणि पॅराट्रुपर छत्रपाल सिंह यांचा समावेस होता. दहशतावाद्यांचा पाठलाग करतानाच स्क्वॉडचे तीन जवान बर्फात अडकले. दहशतवादी याच भागात लपून बसले होते. त्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत जवानांवर हल्ला केला.