नवी दिल्ली । पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार्या चार हिरोनां देशाच्या तिन्ही सेनांचे सुप्रीम कंमाडंर आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित केले. शुक्रवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात सर्जिकल स्ट्राइकची मोहीम यशस्वीपणे फत्ते करणार्या मेजर दीपककुमार उपाध्याय, मेजर रजत चंद्र, कॅप्टन आशुतोष कुमार, पॅरा टुपर अब्दुल क्युम यांना गौरवण्यात आले. या पथकातील मेजर रोहित सुरी यांना कीर्ती चक्र आणि नायक सुभेदार विजयकुमार यांना शौयचक्र देऊन याआधीच 20 मार्च रोजी सन्मानीत करण्यात आले होते. उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात काश्मीरमध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या नायक पांडुरंग गवांदे, नायक सूभेदार के वी सुब्बारेड्डी आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल संजीवनसिंग यांना मरणोत्तर शौर्यपदक देण्यात आले.
सर्जिकल स्ट्राइक करताना मेजर रजत चंद्र यांनी अतिरेक्यांचा पहिला तळ उदध्वस्त करताना तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यानंतर मेजर दीपककुमार उपाध्याय यांनीही आपल्या तुकडीचे नेतृत्व करताना सोपवलेली जबाबदारी यशस्वी केली. ही कारवाई करत असताना या अधिकार्यांनी आपला एकही सहकारी जखमी किंवा शहीद होणार नाही याची काळजी घेत अतिरेक्याचे तळ उद्ध्वस्त केले. कॅप्टन आशुतोष कुमार यांनी या कारवाईदरम्यान चार अतिरेक्यांना कंठस्नान घालत एकही अतिरेकी पळून जाणार नाही याची दक्षता घेतली. पॅराटूपर अब्दुल क्युम यांनी स्काऊटची भूमिका बजावत आपल्या सहकार्यांना अतिरेक्याच्या तळाजवळ नेलेच याशिवाय अतिरेक्यांचे बंकर आणि टेहळणी पोस्ट उद्ध्वस्त केले. 29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये पॅरा कमांडोज सहभागी झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील उडी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषेच्या पार भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या सर्जिकल स्टाइक अमेरिकेसह अनेक देशांनी समर्थन केले होते.
शहीद पांडुरंग गावडे
जम्मू काश्मीरमधील कूपवाडा येथे ड्रगमुला येथे जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण पत्करणार्या पांडुरंग गावडे यांनी आपल्या घराण्याची आणि पथकाची लष्करी परंपरा कायम राखली होती. सुरुवातीला मराठा लाइट इन्फंट्री आणि 41 राष्ट्रीय रायफल्स या दहशतवादविरोधी पथकात असलेल्या गावडेनी लष्कराच्या आणि मराठा लाइफ इन्फंट्रीच्या परंपरेचे पालन करत आघाडीला राहून आपल्या पथकाचे नेतृत्व केले. सर्व प्रकारचे युद्धकौशल्य आणि तंत्रकौशल्यात माहिर असणार्या गावडेंनी नऊ तास दहशतवाद्यांशी झुंज दिली. या चकमकीदरम्यान स्फोटकांतील छर्रे पायात आणि डोक्यात घुसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गावडेंना तातडीने 168 मिलिटरी हॉस्पिटल आणि नंतर श्रीनगरमधील 92 बेस रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. पांडुरंग गावडे यांचे दोन्ही मोठे भाऊ सेनादलातील सेवेत होते. मोठे भाऊ गणपत गावडे हे लष्करातून निवृत्त झाले आहेत, तर मधला भाऊ अशोक गावडे एनसीसीच्या सेवेत आहेत. पांडुरंग गावडे यांच्या पश्चात आई, पत्नी प्रांजल, दोन मुले प्रज्ज्वल आणि वेदांत असा परिवार आहे.