नवी दिल्ली- सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी होऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणारे लान्स नायक संदीप सिंग शहीद झाले आहेत. तंगधरमध्ये भारतीय लष्कराचे जवान घुसखोर आणि दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत होते. त्याचवेळी गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेले लान्स नायक संदीप सिंग यांचा मृत्यू झाला. त्यांना गोळी लागली होती तरीही त्यांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या या जवानाचा अंत झाला आहे. त्यांच्या मागे त्यांची मुलगी आणि पाच वर्षांचा एक मुलगा असे कुटुंब आहे.
संदीप सिंग यांच्याबाबत महत्त्वाची बाब अशी की २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये ते सहभागी होते. पाकिस्तानच्या सीमेत शिरून भारतीय सैन्याने अनेक दहशतवादी चौक्या नेस्तनाबूत केल्या होत्या. तसेच अनेक दहशतवाद्यांचाही खात्मा केला होता. या मोहिमेत प्राणांची बाजी लावून संदीप सिंगही उतरले होते. याच संदीप सिंग यांना सोमवारी दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आले.
२००७ मध्ये संदीप सिंग लष्करात भरती झाले, ४ पॅरा उधमपूर या ठिकाणी ते ड्युटीवर होते. घुसखोर आले आहेत अशी माहिती जेव्हा लष्कराला मिळाली तेव्हा त्यांना तंगधरला पाठवण्यात आलं. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळीमुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना श्रीनगरच्या ९२ बेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.