वैद्यकिय समितीच्या अहवालानंतर होणार निर्णय

0

कल्याण : सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मोहने येथे घडली. त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच यश हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. तर खडकपाडा पोलिसांनी मेडिकल समिती अहवालानंतर कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कल्याणनजीक मोहने येथे राहणारा नरसिंग भंडारी हा रेल्वे ट्रॅकनजीक लघुशंकेसाठी गेला असता त्याला साप चावला. त्यानंतर नरसिंगला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने नरसिंगला कल्याण येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच नरसिंहची प्राणज्योत मालवली. नरसिंगचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप नरसिंगच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर नरसिंगला काय चावले आहे याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी काहीच सांगितले नाही. तसेच रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने नरसिंगला कल्याणमधील आयुष रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे यश रुग्णालयाचे डॉक्टर अविनाश चाटप यांनी सांगितले. मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटर नव्हते तर रुग्णाला अ‍ॅडमिट का करून घेतला असा सवाल उपस्थित झाला आहे. मोहने येथे पत्नी व तीन मुलांसह नरसिंग राहत होता. त्याची एक मुलगी मूकबधिर आहे. नरसिंग हा सिव्हिल काँट्रॅक्टर होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.