सर्पदंशावर परिणामकारक औषधांची दिली माहिती

0

सर्पमित्र बडदे यांनी राबविला उपक्रम

खडकी : सर्पदंश झाल्यावर घाबरुन न जाता व इतर कुठल्याही मार्गाचे अनुकरण न करता सरळ रुग्णालयांचा मार्ग धरावा. कारण सध्याच्या आधुनिक युगात सर्पदंशावर बहुमुल्य व परिणामकारक अशी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे बाकीचे उपचार न करता प्रथम डॉक्टरांकडे धाव घ्यावी, अशी महत्वपुर्ण माहिती सर्पमित्र विनायक बडदे यांनी येथे दिली. वंदेमातरम संघटना खडकी विभागाच्यावतीने खडकी कँन्टोन्मेंट बोर्डातील सफाई व अग्निशामक दलातील कर्मचार्‍यांकरिता नुकतेच लालबहाद्दुर शास्त्री विद्यालय येथिल मैदानात सर्पज्ञान विषयक महत्वपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना बडदे बोलत होते.

यावेळी कँन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधिक्षक बी.एस.नाईक, संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, अ‍ॅड.इंद्रकुमार बन्सल आदी उपस्थित होते. सर्पमित्र बडदे यांनी यावेळी विविध जातींच्या व प्रकारांच्या सर्पांची ओळख करुन दिली. यामध्ये विषारी बिनविषारी साप तसेच सापांबद्दल असणारे गैरसमज भिती, अंधश्रध्दा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सर्प हाताळताना व सर्पदंश झाल्यावर घ्यावयाची काळजी अशा महत्वपुर्ण विषयांवर बडदे यांनी सविस्तररित्या माहिती विशद केली. यावेळी कँन्टोन्मेंट कर्मचारी व नागरिकांनी विचारलेल्या शंका व प्रश्‍नाचेही त्यांनी निरसन केले. सर्पदंश झाल्यावर घाबरून न जाता व इतर कुठलीच उपाय योजना न करता सरळ रुग्णालयाचा मार्ग अवलंबावा. कारण सध्याच्या आधुनिक युगात सर्पदंशावर परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत, असा महत्वपुर्ण सल्ला या वेळी बडदे यांनी दिला. प्रास्ताविक व आभार शिरीष रोच यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहु राक्षे, राजेश बागनाईक, राजेश रजपुत, अनिल सोनवणे, सतिष बटेल्लु, करण चव्हाण, आनंद रेड्डी यांनी विशेष परिश्रम घेतले.