सर्वसामान्यांना आर्थिक झळ: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सहाव्या दिवशी वाढ

0

मुंबई:कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले असताना सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ५७ पैशांनी वाढ करण्यात आली तर डिझेलच्या दरांत प्रतिलिटर ५९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी 60 पैशांची वाढ करण्यात आली होती. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सहा दिवसांत पेट्रोल तीन रुपये ३१ पैशांनी महागले आहे.

पेट्रोलच्या दरांत सहाव्या दिवशी वाढ झाल्यामुळे मुंबईत आज शुक्रवारी पेट्रोल प्रतिलिटर ८१ रुपये ५३ पैसे मिळत आहे तर डिझेल प्रतिलिटर ७१ रुपये ४८ पैसे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कच्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. मात्र, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झालेली दिसत आहे.
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती वाढून प्रतिलिटर क्रमश: ७४.५७ रुपये, ७६.४८ रुपये, ८१.५३ रुपये आणि ७८.४७ रुपये झाल्या आहेत. तर डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. डिझेल क्रमश: ७२.८१ रुपये, ६८.७० रुपये, ७१.७४ रुपये आणि ७१.१४ रुपये प्रति लीटर झालं आहे.

कच्च्या तेलाचे दरही ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या कालावधीत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. १६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल करण्यात आला.