सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेसच समर्थ

0

शिरपूर : सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रात व देशात नव्याने परिवर्तनाची लाट सुरु झाली असून काँग्रेसला सर्वत्र अनुकूल वातावरण तयार होत आहे. कल्याणकारी राज्य काँग्रेसच देऊ शकते. सर्वसामान्यांचा व गोरगरीबांचा काँगे्रस हाच पक्ष असून खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत आलेला भाजपा फुसका बार ठरला आहे. त्यांच्या निष्क्रियतेवर लवकरच जन आंदोलन करण्यात येणार असून नोटाबंदीसारख्या अनेक अपयशी निर्णयांमुळे सर्वसामान्यांसह देशवासीयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
शिरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील उमर्दा येथे काँग्रेस आदिवासी कार्यकर्ता मेळावा तसेच विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा विधान परिषद विधीमंडळ गटनेते आ.शरद रणपिसे, आ.काशिराम पावरा, नितीन सेठीया, धुळे जिल्हा काँगे्रस कमिटी अध्यक्ष शामकांत सनेर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते आदी उपस्थित होते.

अमरिशभाईंचे कार्य गौरवास्पद
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, नोटाबंदीचा फार मोठा फटका सर्वांनाच बसला. १२२ जण मृत्यूमुखी पडले. सर्वांचा कष्टाचा पैसा काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. हा चूकीचा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरला आहे. प्रशासन व देश काँग्रेसच चालवू शकते हे सिद्ध होत आहे. गांधी घराण्याने मोठे योगदान दिलेल्या काँग्रेसशिवाय देशाला पर्याय उरलेला नाही. काँगे्रसने सर्वसामान्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून जीवनमान उंचावण्याचे काम केले. राज्यात दुष्काळ असतांना व गारपीट तसेच अनेक नैसर्गिक संकटे आल्यानंतर काँगे्रसच्या सरकारने शेतकरी बांधवांना खूप मदत केली. भाजपा सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरत आहे. आ.अमरिशभाईंचे कार्य नेहमीच गौरवास्पद ठरले असल्याने काँग्रेसतर्फे त्यांचे कौतुक केले जाते. पाणी व शिक्षणासाठी केलेले त्यांचे विशेष काम पाहून फार आनंद होतो.

आदिवासींच्या कल्याणार्थ काम करत राहणार- आ.अमरिशभाई
आ.अमरिशभाई पटेल म्हणाले की, आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी नेहमी काँग्रेसनेच सहकार्याच्या भावनेने काम केले असून गेल्या ३५ वर्षात तालुक्याच्या सेवेसाठी मी प्रयत्न केले आहेत. रस्ते, पूल, पाण्यासह शिक्षण, उद्योग या सर्वच क्षेत्रात मोठे काम केले आहे. थेट माणसाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केले. ग्रामीण भागात सर्वांशी स्नेहसंबंध टिकविले. राज्यातील सर्वात जास्त १० हजार वनजमिनींचे पट्टे काँग्रेसमुळे शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना वाटण्यात आले. उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले. गांधी घराण्याचे योगदान असलेल्या काँग्रेसमुळेच सर्वांचा विकास झाला. स्व.इंदिरा गांधी यांच्या विचारानेच मी चालत असून त्यांच्या कार्याला पुढे नेत आहे. यावेळी आ.अमरिशभाई भावनावश झाले.

आ.काशिराम पावरा म्हणाले की, काँग्रेस व अमरिशभाईच आदिवासी बांधवांचे सर्वेसर्वा आहेत. रात्रंदिवस निस्वार्थ भावनेने काम करतांना त्यांनी सर्वांना न्याय दिला आहे. शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी त्यांचे कार्य खूपच महत्वपूर्ण आहे. शामकांत सनेर म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयातून अपयशी ठरलेल्या सरकारने सर्वसामान्यांसह सर्वांचे मोठे नुकसान केले आहे. सर्वांनी काँग्रेसला साथ देऊन सत्तांतर होण्यासाठी प्रसत्न करायचे आहेत.