सर्वांना समान न्यायाची रामनाथ कोविंद यांची हमी

0

मुंबई- भारताच्या संविधानाचे सर्वोच्च महत्त्व टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संविधानामध्ये तरतूद केल्याप्रमाणे जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती झाल्यावर सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मुंबईत दिली.

रालोआच्या घटकपक्षांच्या महाराष्ट्रातील आमदार-खासदारांची भेट घेण्यासाठी कोविंद मुंबईत आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेना नेते व राज्याचे मंत्री सुभाष देसाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री अनंत गीते, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट, भाजपा विधिमंडळ मुख्य प्रतोद राज पुरोहित, बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार नित्यानंद राय व खासदार सुनील सिंह उपस्थित होते. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे उपस्थित होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीला पाठ फिरवली. कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित होते. त्यामुले आजची त्यांची उपस्थिती अनेकांना खटकली.

रामनाथ कोविंद म्हणाले की, देशातील सर्व राज्यांचा सर्वांगिण विकास व्हावा व सर्वांना समान न्याय मिळावा, देशातील युवावर्गाच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच शिक्षणाचा प्रसार व आधुनिकीकरण हे आपले प्राधान्याचे विषय असतील. राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.नितीन गडकरी म्हणाले की, रामनाथ कोविंद हे मोठे कर्तृत्व आणि व्यासंग असलेले शालीन व्यक्ती आहेत. रालोआने राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली आहे. त्यांना ऐतिहासिक यश मिळेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविंद यांच्याकडे संघटन कौशल्य व प्रशासकीय कौशल्य आहे. ते संविधानाचे जाणकार आहेत. त्यांना महाराष्ट्रातून मोठे मताधिक्य मिळेल.

रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, स्वच्छ प्रतिमा, साधेपणा व विनम्रता ही रामनाथ कोविंद यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.सुभाष देसाई यांनी सांगितले की, रालोआच्या उमेदवाराला विजयी करण्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार व आमदार रामनाथ कोविंद यांना मते देतील.रामदास आठवले म्हणाले की, आंबेडकरी चळवळीशी संबंध असलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होणार याचा सर्वांना आनंद आहे. आपण त्यांना रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळ व दलित जनतेतर्फे शुभेच्छा देतो.