सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याचा धोका कायम

0

नवी दिल्ली । कॉम्प्युटर लॉक करून खंडणी मागणारा वानाक्राय रॅन्समवेअर हल्ल्याचा भारतासह जगातील 150 पेक्षा जास्त देशांना धोका कायम आहे. पुढील एक-दोन दिवसांत पुन्हा सायबर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्‍वभूमीवर वीज, टेलिकॉम, विमानतळ, बँकिंग, शेअर बाजार, शाळांसहित मूलभूत सुविधांशी संबंधित संस्थांना सीईआरटी-इन या सायबर सुरक्षा संस्थेने रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

2 लाखाहून जास्त कॉम्प्युटर झाले लॉक…
युरोपियन युनियनच्या युरोपोलनुसार 2.27 लाखांपेक्षा जास्त संगणक लॉक झाले आहेत. संबंधित तज्ज्ञ पहिल्या व्हर्जनवरही तोडगा काढू शकलेले नाहीत. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश पोलीस विभागातील संगणकांनाही या रॅन्समवेअरचा अंशत: फटका बसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. दुसरीकडे, आज (सोमवारी) दुसर्‍या हल्ल्याचाही धोका कायम राहिला आहे. रॅन्समवेअर हल्ला शुक्रवारी रात्री झाला होता. मात्र दोन दिवस कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे भारतात या सायबर हल्ल्याचा किती परिणाम झाला, याची माहिती मिळण्यास विलंब लागत आहे.

दुसरे व्हर्जन रोखणे अशक्य
आज किंवा पुढील दोन-तीन दिवसांत दुसरा सायबर हल्ला होऊ शकतो, अशी भीती मेलवेअर टेक या ब्रिटश संस्थेने व्यक्त केली आहे. सोमवारपर्यंत दुसरे व्हर्जन येऊ शकते. त्याला आम्ही रोखू शकत नाही. मालवेअर टेकनेच पहिल्या हल्ल्याची गती कमी करण्यास मदत केली होती. मात्र, दुसरे व्हर्जन अधिक शक्तिशाली असू शकते, असे या संस्थेच्या तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

70 टक्के एटीएममध्ये विंडोज एक्सपी, सर्वात सोपे लक्ष्य
रॅन्समवेअरपासून विंडोज एक्सपीला सर्वात जास्त धोका आहे. भारतात 70 टक्के एटीएममध्ये एक्सपीचाच वापर आहे. हल्ल्यानंतर मायक्रोसॉफ्टने एक्सपीच्या सुरक्षेचे पॅचही जारी केले आहेत.युरोपोलनुसार अजून खंडणी देणार्‍यांची संख्या खूप कमी आहे. टी-इननेही लोकांना खंडणी देऊ नये असे आवाहन केले.

कार्यालयात जाऊन आधी हे काम करा…
संगणकात अँटी व्हायरस आणि विंडोजचे पॅच अपडेट आहेत का हे तपासा. ई-मेलमध्ये संशयित लिंक दिसली तर क्लिक करू नका. तशी अटॅचमेंट उघडू नका किंवा डाऊनलोड करू नका. पेनड्राइव्ह स्कॅन करूनच वापरा.

हल्ला झालाच तर…
व्हायरस अ‍ॅक्टिव्ह होण्यास सुरुवात झाली की आधी नेटवर्क केबल काढा. म्हणजे इतर संगणक संक्रमित होणे टळेल. तसेच संगणक त्वरित शटडाऊन करा.