निगडी (प्रतिनिधी) – निगडीतील भक्ती-शक्ती चौक हा भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वात उंचीचा राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल, असे मत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे अनावरण वैष्णव यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य राजू मिसाळ, अमित गावडे आदी उपस्थित होते.
घरात, कार्यालयात राष्ट्रध्वज लावा!
याप्रसंगी वैष्णव म्हणाले, निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रती राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयांच्या मनात वृध्दींगत होण्यास मदत होणार आहे. शौर्य, विरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येवू अथवा तिरंग्यात शरीर झाकून येवू अशी शपत घेतात. कारगीलच्या युध्दामध्ये विजय प्राप्त करुन तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे म्हत्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल, असेही वैष्णव म्हणाले.
राष्ट्रध्वजाचा मान-सन्मान ठेवा : कर्नल साळुंके
निवृत कर्नल सदानंद साळुंके म्हणाले, की भक्ती-शक्ती चौकातील देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासीयांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून, या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कुठेही घाण करु नका. कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्व इतरांना ही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून स्वत:मधील देशभक्ती जागृत ठेवणे ही गजेचे आहे. महापौर नितीन काळजे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणाची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वात (107 मीटर) उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहिल.
दहा हजारपेक्षा जास्त शहरवासीयांची उपस्थिती
शहरातील मनपा शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगातील वेशभुषा परिधान करुन तिरंगी रंगातील हजारो फुगे आकाशात सोडले. भक्ती-शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाऊन निघाला होता. सुमारे दहा हजार पेक्षा अधिक नागरिकांनी या एतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती शक्तीचा परिसर भारत माता की जय व बंदेमातरम च्या घोषणेने दुमदुमून गेला होता. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या पथकाने ध्वज गीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. या कार्यक्रमापूर्वी संदीप पंचवाटकर यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला.
निगडीत 107 मीटर उंचीचा भव्य तिरंगा!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर शुक्रवारी मोठ्या उत्साहात ब्रिगेडियर ओ. पी.वैष्णवी यांच्याहस्ते तिरंगा फडकविण्यात आला. देशातील सर्वाधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज आहे, असा दावा पिंपरी पालिकेकडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी 84 वर्ष वयाचे कर्नल साळुंके हे पुण्यातून सायकल चालवत आले. त्यांच्या स्वागतासाठी सायकल मित्र परिवार व पिंपरी-चिंचवड बुलेट राईडर एमएच -14 ग्रुपचे सदस्य राहुल वाडकर, सुनील पाटील, भैयासाहेब लांडगे, डॉ. नीलेश लोंढे यांनी नेतृत्व केले. ध्वजवंदन रॅली सकाळी सव्वाआठ वाजता चाफेकर चौकातून निघून वाल्हेकरवाडी-मिनी मिरॅकल स्कूल मार्गे भक्ती शक्ती उद्यानात सकाळी पावणे दहा वाजता दाखल झाली. शहरातील सर्व सायकलप्रेमी या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.