सर्व काही सत्तेसाठी!

0

आडवाणींची रथयात्रा अन् बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याची घटना त्यानंतर झालेल्या दंगलींमध्ये दोन हजार जणांचे प्राण गमावले. त्यातील 700 मृत निरपराध एकट्या मुंबई शहरातील दंगलीतील होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध आजही लागलेला नाही. त्याची मोठी रिअ‍ॅक्शन मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाने झाली. अनेक निरपराधांचे पुन्हा बळी गेले. त्याचा फायदा शिवसेना-भाजपला झाला. सत्तेसाठी आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती नको.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या नव्या कार्यालयाचेे उद्घाटन केले. अमित शहा, लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज यांसारखे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. पक्ष कार्यालय स्थलांतरित करणारा भाजप पहिलाच पक्ष आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच मोदी आणि शहा यांनी नव्या कार्यालयाच्या पायाभरणीचा दगड ठेवला होता. नव्या कार्यालयात पक्ष पदाधिकार्‍यांना राज्य आणि स्थानिक पातळीवर रिअल टाइम चर्चा करण्यासाठी आधुनिक उपकरणे लावली आहेत. नव्या ऑफिसमध्ये भाजप नेत्यांना ट्रेनिंग देण्यासाठी हॉलही आहे. सोबतच टॉप फ्लोअरवर एक म्युझियम आहे. यात पक्षाच्या इतिहासाशी निगडित पुस्तके ठेवली आहेत. मोदी शहा जोडीने जशी कार्यालयाच्या नव्या चेहर्‍याची पायाभरणी केली तशी केंद्रातल्या सत्तेची आणि पक्षाचीही केली. जुन्या पिढीतले लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी आता अडगळीत पडले आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी करत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 28 वर्षांपूर्वी रथयात्रा काढली होती. त्यांच्या रथयात्रेनंतर अयोध्येत बाबरी मशीद जमीनदोस्त झाली. लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले. देशभर दंगली उसळल्या. जयपूर, जोधपूर, हैद्राबाद, अहमदाबाद, मुंबई, भिवंडी येथे मुस्लीम समाजाला टार्गेट करण्यात आले. त्यांच्या रथयात्रेदरम्यान 1 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर यादरम्यान देशात 166 जातीय दंगली झाल्या आणि त्यादरम्यान, 566 लोक मारले गेले, सरकारी आकडेवारी हे सांगते. 23 ऑक्टोबरला आडवाणींना अटक झाली होती. त्यानंतर झालेल्या दंगलींमध्ये दोन हजार जणांचे प्राण गमावले. त्यातील 700 मृत निरपराध एकट्या मुंबई शहरातील दंगलीतील होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध आजही लागलेला नाही. त्याची मोठी रिअ‍ॅक्शन मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाने झाली. अनेक निरपराधांचे पुन्हा बळी गेले. त्याचा फायदा शिवसेना-भाजपला झाला. राज्यात 1995 ला शिवसेना-भाजपची सत्ता आली तर देशावर अटलजींचे म्हणजेच भाजपचे सरकार आले. पण ते 13 दिवसांत कोसळले. पुन्हा 13 महिन्यांची सत्ता भाजपने आणली. तेव्हापासून भाजपचा सत्ता संघर्ष 2014 पर्यंत सुरू राहिला अन् नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीने ते स्वप्न साकार केले. परंतु, आता भाजपला देशावर सत्ता कायम ठेवण्याचे तंत्र जरा अवघड वाटू लागले आहे.

गुजरात, राजस्थान आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुकात भाजपला झटके बसल्यानंतर पुन्हा भाजपच्या चाणक्यांमध्ये अस्वस्थता सुरू झाली आहे. असे झाले की मतांसाठी नवे नवे पत्ते भाजपकडून बाहेर काढले जातात. परंतु, आता मात्र भाजपने जुनाच पत्ता पुन्हा खोलला आहे. तो म्हणजे राम मंदिराचा. पुन्हा राममंदिराचा नारा देत रथयात्रा सुरू झाली आहे. मंगळवारच्या महाशिवरात्रीपासून अयोध्येत रथयात्रा सुरू झाली. महाराष्ट्रातील संस्था श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटी आणि विश्‍व हिंदू परिषदेने या ’रामराज्य’ रथयात्रेचे आयोजन केले आहे. अयोध्येतून सुरू होणार्‍या या रथयात्रेचा तामीळनाडूच्या रामेश्‍वरममध्ये समारोप होणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याची मागणी करण्यासाठी ही रथायात्रा काढण्यात आली आहे. कारसेवकपुरम सोसायटीने प्रस्तावित राममंदिराबाबत कार्यशाळा आयोजित केली होती. त्याच दिवशी रथयात्रेला सुरुवात होणार झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. महाशिवरात्रीच्या दिवशी सुरू झालेल्या या रथयात्रेचा समारोप 25 मार्च रोजी राम नवमीच्या दिवशी होणार आहे. यावेळी केंद्र सरकारकडे 14 महिन्यांच्या आत राम मंदिर बांधण्याची मागणी करण्यात येणार आहे. ही रथयात्रा उत्तर प्रदेशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडूमधील वाराणसी, प्रयाग, चित्रकुट, उज्जैन, नाशिक, बदलापूर, बंगळुरू आणि रामेश्‍वरम या शहरातून जाणार आहे. आडवाणींचा रथ शरद यादव यांनी रोखला होता. लालू प्रसाद यादव आणि शरद यादव तेव्हा आडवाणीवर तुटून पडले होते. मात्र, आता तसा आवाज कुठे उमटलेला आढळत नाही. आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती नको. भाजपचा आटापिटा सत्तेच्या खुर्चीसाठी आहे तर संघाचा त्यांच्या विचारांसाठी पण त्यात आणखी किती बळी घेणार. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी कालच जाहीर विधान केले आहे. ‘मी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर बांधायला ही जाईन’, असे धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले आहे. त्रिपुरा विधानसभेचे मतदान झाले आता कर्नाटकचा डंका वाजतो आहे. त्यानंतर लगेचच लोकसभेची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. निवडणुका कदाचित ठरलेल्या वेळेतही होतील. परंतु, तोपर्यंत भाजप आपल्या अजेंड्यासाठी एक एक पाऊल पुढे सरकण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त यावेळी मोदी आणि शहा यांचा चेहरा पुढे आहे.

– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111