नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावे, असे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले. लोकसभेत आज कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी काँग्रेसने मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विविध पक्षाच्या खासदारांनी आपली मते व्यक्त केली.
राजकारण नको, जीव वाचवा
यावेळी ओवेसी म्हणाले की, मला कुलभूषण जाधवप्रकरणाचे राजकारण करायचे नाही. पाकिस्तानने कायदेभंग करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या खटल्याबाबतची माहिती सरकारला असायला हवी होती. आता कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवण्याला प्राधान्य हवे. ते आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सरकाने दबावतंत्र वापरावे. मोदी सरकारने सर्व शक्ती पणाला लावून कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवावा. प्रसंगी आंतरराष्ट्रीय दबाव टाकावा. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कोणत्याही पुराव्याशिवाय थेट कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुराव्याशिवाय पाकिस्तानचे नाटक सुरू आहे. मात्र कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणे हेच आपले ध्येय हवे, असे ओवेसी म्हणाले.
पंतप्रधानांच्या मुलीच्या लग्नाला जाता, आता गप्प का?
यावेळी कुलभूषण जाधव मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरले. पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला जातात. मग आता ते गप्प का? कुलभूषण जाधवांसाठी ते एक फोन करू शकत नाहीत का, असा सवाल काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला. कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी मोदी सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलायचा हवी. सरकार इतके गप्प कसे बसू शकते. आता सरकारने कडक पावले उचलण्याची गरज आहे, असेही खर्गे म्हणाले.
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा
यावेळी भाजपकडूनही सरकारची बाजू मांडण्यात आली. सरकार कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. कुलभूषण जाधव यांच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे. धोकेबाज पाकिस्तानला धडा शिकवू. मोदी सरकार पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जगभरातूून तसे प्रयत्न सुरू असल्याचे भाजप खासदार म्हणाले.
कुलभूषण जाधवांना वाचवण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलू
यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कुलभूषण जाधवांना वाचवण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलू, असं राजनाथ सिंह म्हणाले. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने भारताला विश्वासात घेतले नाही. कुलभूषण जाधव यांच्याकडे भारताचा पासपोर्ट आढळला, मग ते रॉ एजंट कसे असू शकतात? कुलभूषण जाधव व्यवसायानिमित्त परदेशात गेले होते. मात्र त्यांचे इराणमधून अपहरण झाले, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली.
बलुचिस्तानात अटक
कुलभूषण जाधव यांच्यावर रॉ चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती.
कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आले होते. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचे उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेले नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे. भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही.
भारताचे पाकिस्तानवर ताशेरे
कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असे पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे. कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणे हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जात असल्याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दांत भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत.
ठोस पुरावे नाहीत
हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवांविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केले होते. मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असे अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितले होते.