जळगाव। सर्व शिक्षा अभियानांतर्गत 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी मराठी व उर्दू, हिंदी माध्यमात शिकणार्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.
महापालिका व अनुदानीत शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप केले होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड लागावी व कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पहिली ते आठवीपर्यंत मोफत पुस्तकांची सोय आहे. त्यानुसार राज्य पाठ्यपुस्तक व निर्मिती मंडळाच्या वतीने मनपाशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. जवळपास 76 टक्के पुस्तके दाखल झाली असून शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व पुस्तके उपलब्ध होतील.
वाटपाची सुरूवात 5 जून रोजी
मनपाशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापकांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. त्यानंतर वर्गशिक्षकांच्या माध्यमातून ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत.शहरातील महापालिकेच्या 25 व खाजगी अनुदानीत व अंशता अनुदानीत 82 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध झाली आहेत. यात 1ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जवळपास 46 हजार विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांचे वाटपाची सुरूवात ही 5 जून पासून करण्यात येणार असून पाठ्यपुस्तक वाटपाचे काम 15 जूनपर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान हिंदी माध्यमांचे कोणत्याही वर्गांचे पाठ्यपुस्तक उपलब्ध झालेले नाहीत.