सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा खोल्यांचे बांधकाम पूर्णत्वाकडे

0

रावेर – सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत तालुक्यातील पिंपरकुंड जिल्हा परीषद शाळेत दोन वर्ग खोल्या तर केर्‍हाळे बु.॥ येथे नवीन शाळा खोलीचे बांधकाम पूर्णत्वाकडे येत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिली.

शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी 23 लाख 31 हजार रुपयांचे अनुदान शाळा स्तरावर देण्यात टप्प्या-टप्प्याने देण्यात आले आहे. जिल्हा परीषद शाळा मंगरुळ व लोहारा येथे शाळा दुरुस्तीसाठी दोन लाख तेरा हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटीसाठी जिल्हा परीषद शिक्षक लोकसहभागातून शाळा विकासाचे कार्य करीत आहेत. यासाठी जिल्हा परीषद व पंचायत समिती पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. तालुक्यातील 27 जिल्हा परीषद शाळातील वापरात नसलेल्या व जीर्ण झालेल्या 78 शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परीषद शाळा चिंचाटी येथे स्वछतागृह बांधण्यात येत आहे. तालुक्यातील 111 जिल्हा परीषद शाळांमध्ये डिजिटल साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित 39 शाळा लवकरच डिजिटल होतील. यासाठी केंद्रप्रमुख मार्गदर्शन करीत आहेत. गुणवत्ता वाढीसाठी व शाळांवर तपासणी द्वारे नियंत्रण करण्यासाठी एक दिवस केंद्रासाठी हा शाळा तपासणी कार्यक्रम कुंभारखेडा, निंभोरा केंद्रातील शाळासह सुमारे 50 शाळांमध्ये राबविण्यात आला असून मार्च अखेर सर्व शाळांना या अंतर्गत भेटी दिल्या जातील, असेही पवार यांनी सांगितले.