सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कल्याणकारी उपक्रमांची गरज

0

औंध – देश खर्‍या अर्थाने सर्व बाजूंनी विकसित व्हायचा असेल तर सर्व समाजघटकांना पुढे घेऊन जाऊ शकणार्‍या कल्याणकारी उपक्रमांची गरज आहे. त्याचपद्धतीने स्मार्ट सिटी स्टार्ट अप इंडिया उपक्रमांतर्गत औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरातील नव उद्योजकांना उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे सरकारचे उज्ज्वल भारताचे स्वप्न खर्‍या अर्थाने पूर्ण होत आहे, असे मत भाजपच्या प्रवक्त्या श्‍वेता शालिनी यांनी व्यक्त केले.

स्मार्ट सिटी स्टार्ट अप इंडिया उपक्रमांतर्गत औंध, बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी परिसरातील नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन श्‍वेता शालिनी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 128 नव उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी साह्य करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, उपक्रमाचे सहसंयोजक रवि घाटे, मंदार राराविकर, शिशिर तरळ, अभय बागल, उद्योजक तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बालवडकर म्हणाले, स्मार्ट सिटी स्टार्ट अप उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये उद्योजकता वाढीला लागेल, केवळ मार्गदर्शनपर व्याख्यान न ठेवता 100 दिवस उद्योजकांना सर्व कार्यालयीन सुविधा याठिकाणी मोफत देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांना सुवर्णसंधी मिळाली असून सर्वसामान्य ते उच्चशिक्षित कुटुंबातील विविध स्तरातील उद्योजक यामध्ये सहभागी झाले असून अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. नवीन उद्योजकांना प्रेरणा देणारा सामाजिकदृष्ट्या देशाच्या विकासास हातभार लावणारा हा उपक्रम ठरेल. स्मार्ट सिटी संकल्पनेत यांसारख्या कल्पनांचा समावेश करू असे आश्‍वासन राजेंद्र जगताप यांनी दिले.