नागपूर । प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 52 तास स्वयंपाक करत नवा विक्रम रचला आहे. विष्णू मनोहर यांनी अमेरिकेचे बेंजामिन पेरी यांचा 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा विश्वविक्रम मोडत नवा रेकॉर्ड केला आहे. या 52 तासांमध्ये त्यांनी एकूण 1 हजार पदार्थ बनवल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. विष्णू मनोहर यांनी 1001 रेसिपीज व शाकाहारी रेसीपीज असे नवे जागतिक विक्रम केले. यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवले जाईल.
अन्नपूर्णेची पूजा, सत्यनारायणाच्या प्रसादाने सुरुवात
नागपुरातील मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स येथे शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांनी शुक्रवार, 21 एप्रिल रोजी सलग 52 तास पाककृती करण्याच्या विश्वविक्रमाला सत्यनारायणाचा रव्याचा शिरा, अन्नपूर्णेची पूजा करून सुरुवात केली. त्यानंतर रविवारी म्हणजेच 23 एप्रिल रोजी 4.30 वाजता विष्णू मनोहर यांचा 52 तासांचा स्वयंपाकाचा विक्रम पूर्ण झाला.
खवय्यांना निःशुल्क पदार्थ
या विश्वविक्रमाचे साक्षीदार असलेल्या रसिक खवय्यांना नि:शुल्क खाण्यास मिळाले. मनोहर यांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले आहेत. केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील आहेत. कुकिंग मॅरेथॉनचा 40 तासांचा वर्ल्ड रेकार्ड अमेरिकेतील एम. बेंजामिन जे पेरी यांच्या नावाने आहे. मनोहर यांना तिसर्या प्रयत्नात परवानगी मिळाली होती.