अमळनेर । तालुक्यातील मुडी येथील एका शेतकर्याच्या 6 महिन्याच्या मुलीला हृदयाचा आजार असल्यामुळे आजार बरा करण्यासाठी किमान 4 लाख रूपयांची आवश्यकता असल्याने त्यांनी ऑपरेशनसाठी शेत गहाण ठेवण्याच्या अटीवर एकाने पैसे दिले, मात्र तेही अपुर्ण दिले. पण ऑपरेशनचे पैसे काही जमत नव्हते, थेट शेत विकायला काढलं, पण खरेदी करायला कुणीही तयार नव्हते. मात्र आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या ओवीसाठी प्रसंगी शेत गहाण ठेऊन उपचार करण्यासाठी पित्याची धडपड, त्यातच प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या ‘बिईंग ह्युमन’ या संस्थेकडून मिळालेल्या मदतीमुळे चिमुकल्या ओवीची हृदयशस्त्रक्रिया पार पडली. आणि गहाण ठेवलेले शेतीची मालकीही कायम मिळणार आहे.
खर्च पेलावणार नसल्याने सुर्यवंशी कुटूंबीय होते अस्वस्थ
तालुक्यातील मुडी येथील रहिवासी प्रमोद माधवराव सूर्यवंशी यांची मुलगी ओवी हिच्या शरीरातील शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त एकत्रित येत असल्यामुळे ती काळी व निळी पडत तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे प्रमोद सूर्यवंशी यांनी तिला अमळनेर येथेच खाजगी रुग्णालयातील डॉ. नितीन पाटील यांच्याकडे उपचार सुरु केले. त्यांनीही त्यांना धुळे येथे उपचार घेण्याचा सल्ला दिला, मात्र धुळे येथुन ही त्यांना मुंबई येथील नायर हॉस्पिटलला हलविले. यात तिचे वजन कमी असल्याने तेथील डॉक्टरांनी ही तिला उपचार देण्यास नकार दिला. त्यावेळी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे आरोग्यधुत रामेश्वर नाईक यांनी तिला फोर्टिज हॉस्पिटल मुलुड च्या रुग्णालयात दाखल केले. ऑपरेशनसाठी किमान 6 लाख रुपये खर्च येणार होता आणि तो प्रमोद सूर्यवंशी यांना झेपणारा नसल्याने त्यावेळी आमदार स्मिता वाघ यांनी ही त्याना मुंबईत सहकार्य करून राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यावेळी मुलीचे काका कमलेश सूर्यवंशी यांना त्यांचे मित्र शुभम पाटील भिवंडी, ज्वाय कांबळे नाशिक यांनी सल्ला देऊन सलमान खानला भेटण्यास सांगितले.
अन् सलमान खानचं बिईंग ह्युमनचे ऑफिस गाठले
सलमान खानचं बिईंग ह्युमनचे ऑफिस ओवीचा काका कमलेशने गाठले, सलमानची बहिण अर्पिताने, कागदपत्र पाहून, सर्व प्रकरण जाणून घेतले. मदत होईल की नाही याची शाश्वती नव्हती, पण अर्पिताने ओवीच्या ऑपरेशनला मदतीचा हात देऊ असा फोन केला. मुंबईत अशा अनेक संस्था आहेत, मग सलमानने असं काय नवीन केले? ओवीला एका दवाखान्याने थोड्या कमी खर्चात ऑपरेशन सांगितलं होते, पण खर्च वाढला तरी चालेल, पण योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑपरेशन करू या, अशी विनंती ओवीच्या पालकांना करण्यात आली. अर्थात ती त्यांनी मान्यही केली. सलमान खान एका 6 महिन्याच्या चिमुकलीला भेटण्यासाठी, वांद्रे येथून थेट मुलूंडला फोर्टिज हॉस्पिटलमध्ये, कुणाला कानोकान खबर न लागू देता, ओवीच्या तब्येतीची विचारपूस करायला पोहोचला. सलमान ओवीला पाहून, तिच्याशी बोलत होता, अगदी आपण आपल्या लहान मुलांसोबत बोलतो तसं, पत्रात हरवलेला लहान मुलांना देतात तसा, गोड पापाही सलमानने ओवीचा घेतला.
सलमान खान कडून विचारपूस
शेत गहाण ठेवल्याचं ओवीच्या काकांनी सांगितले. सलमान ते ऐकून हळवा झाला, हे पाहून सलमानने नुसतेच पैसे दिले नाहीत, तर त्या पैशांना मायेचा ओलावा होता. सलमान याच दरम्यान म्हणाला, शेतकर्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे, पैशांचं काही तरी करू या, आणि डॉक्टरांना आणखी लक्ष द्या, धन्यवाद म्हणून, 6 महिन्याच्या ओवीला बाय करून सलमान, आला तसाच खुष्कीच्या मार्गाने निघून गेला. सलमाने पुढे काय केलं माहित नाही, पण ओवीला डिस्चार्जनंतरही पुढचा एकही रूपया द्यावा लागला नाही, ओवीला आरोग्य तर मिळालं पण तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ओवीच्या वडिलांचं शेतही वाचले.