शिंदखेडा: देशात पाचवा लॉकडाऊन जाहीर झाला. त्यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु कोरोनामुळे जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसाय गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. परिणामी सलून व्यवसायाची आता उपासमार होत आहे. शासनाने हा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली असताना नियम व अटी लादून शासनाने सलून व्यवसायिकांना परवानगी दिल्यास आता उपासमारीची वेळ येणार नाही. त्यामुळे शासनाने नाभिक समाजाच्या या मागणीकडे लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना येथील नाभिक समाज दुकानदारांनी निवेदन दिले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील नाभिक समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन केवळ सलून व्यवसाय आहे. शासनाने आम्हाला परवानगी द्यावी. तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी देवेंद्र परदेशी यांना अशाच प्रकारचे निवेदन समाज बांधवांनी दिले आहे. निवेदन देतेवेळी शिंदखेडा शहर नाभिक दुकानदार संघटनेचे गोविंद बोरसे, संजय बोरसे, हेमंत चित्ते, दिनेश बिरारी, सुरेश महाले, संजय ईशी, सुनील चित्ते, धनंजय पवार, श्याम वरसाळे, भगवान बोरसे, सागर चित्ते, भावेश चित्ते, मनोज बोरसे, गोपाल चित्ते व सर्व दुकानदार बांधव उपस्थित होते.