‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ला उरले अवघे काही तास

0

पुणे । आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ला आता अवघे काही तास उरले आहेत. उद्यापासून या महोत्सवाची रंगतदार सुरुवात होणार आहे. बुधवार ते रविवार (दि. 13 ते 17 डिसेंबर) असे पाच दिवस न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर हा महोत्सव होणार असल्याने तेथील तयारी पूर्ण झाली आहे.

यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये 28 कलाकार कलाविष्कार सादर करतील. ज्यामध्ये देशभरातील दिग्गज, युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचाही सहभाग असणार असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.यंदाच्या महोत्सवाच्या पहिल्या व चौथ्या दिवसाची वेळ ही दुपारी तीन ते रात्रौ 10 अशी असेल. याबरोबरच डिसेंबर 14 व 15 अर्थात दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसाची वेळ ही दुपारी 4 ते रात्रौ 10 अशी असेल. परवानगी मिळाल्यास चौथ्या दिवसाची सांगता ही रात्रौ 12 वाजता होईल. तर रविवार दि. 17 डिसेंबर या शेवटच्या दिवसाची वेळ ही सकाळी 11. 45 ते रात्रौ 10 अशी असेल.

महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
बुधवारी दि. 13 डिसेंबरला मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने दुपारी 3 वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉ. विजय राजपूत यांचे गायन होईल. त्यानंतर देबाशिष भट्टाचार्य यांचे चतुरंगी वादन होईल. त्यानंतर पं. राजन-साजन मिश्रा यांचे गायन तर पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनाने सांगता होईल. दि. 14 डिसेंबरची सुरुवात दुपारी 4 वाजता भुवनेश कोमकली यांच्या गायनाने होणार आहे. यानंतर श्रीमती कलारामनाथ यांचे व्हायोलिन वादन होईल. यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होणार आहे. दुसर्‍या दिवसाची सांगता पं. जसराज यांच्या गायनाने होईल. तिसर्‍या दिवसाची सुरुवात दुपारी 4 वाजता गायत्री जोशी यांच्या गायनाने होईल. कुशल दास यांचे सतारवादन ऐकायला मिळेल. यानंतर सम्राट पंडित यांचे गायन होईल. समारोप पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. चौथ्या दिवसाची सुरुवात दुपारी 3 वाजता प्राध्यापक तुषार दत्ता यांच्या गायनाने होईल. अभय रुस्तुम सोपोरी यांचे संतूरवादन होईल. ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांचे गायन होईल. यानंतर आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन होईल. ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. परवानगी मिळाल्यास या दिवशी रात्री 12पर्यंत महोत्सव सुरू राहील.