सव्वावर्षात तब्बल 18 वेळा महासभा तहकूब

0

सत्ताधारी भाजपकडून किरकोळ कारणांवरून नवा पायंडा
नंतर अनेक विषय एकाच महासभेत आणून विनाचर्चा मंजूर करून घेण्याचा प्रघातच

पिंपरी-चिंचवड : शहरातील विकासकामांचे नियोजन करणे, त्यावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी महिन्यातून एकदा महासभेचे आयोजन केले जाते. परंतु, सत्ताधारी भाजपने गेल्या सव्वा वर्षात तब्बल 18 वेळा महासभा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. एकापाठोपाठ एक महासभा तहकूब करून विषयांची साठवणूक करायची आणि अनेक विषय एकाच महासभेवर ठेऊन विनाचर्चा मंजूर करून घ्यायचे हा महापालिकेत प्रघातच बनला असल्याचे बोलले जात आहे.

दरमहा सभा एकदातरी तहकुबच
महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. सत्तांतर झाल्यानंतर महापौर निवडण्यासाठी 14 मार्च 2017 रोजी पहिली महासभा झाली. नियमाप्रमाणे पहिली महासभा तहकूब करण्यात आली. परंतु, त्यानंतर वारंवार सभा तहकूब करण्याचा सपाटाच सत्ताधार्‍यांनी लावला. 20 जून 2017 ची महासभा तहकूब केली. 20 सप्टेंबर 2017 ची महासभा 16 ऑक्टोबर 2017 पर्यंत तहकूब करण्यात आली. 20 नोव्हेंबर 2017 ची महासभा 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

सव्वा वर्षात 187 ठराव
20 डिसेंबर 2017 ची महासभा दोनदा तहकूब करण्यात आली. 20 जानेवारी 2018 आणि 5 फेब्रुवारी 2018 अशी दोनवेळा तहकूब करण्यात आली होती. तर, 20 जानेवारी 2018 ची महासभा 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत तहकूब केली होती. 20 फेब्रुवारी 2018 ची महासभा दोनवेळा तहकूब केली होती. अर्थसंकल्पाची सभा तर सत्ताधा-यांनी तब्बल सहा वेळ तहकूब केली होती. त्यानंतर 19 मे 2018 ची महासभा पहिल्यांदा 11 जून आणि दुस-यांदा 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. अशा पध्दतीने भाजपने तब्बल 18 वेळा महासभा तहकूब केल्या आहेत. तर, सव्वावर्षात 187 ठराव करण्यात आले आहेत.

विकासकामांवर चर्चाच नाही
सत्ताधार्‍यांनी महासभा तहकुबीचा पायंडाच पाडला आहे. किरकोळ कारणे पुढे करत वारंवार महासभा तहकूब केली जात आहे. यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे. वारंवार सभा तहकूब होत असल्याने महासभेत शहरातील विकासकामांवर चर्चा होत नाही. एकापाठोपाठ एक महासभा तहकूब करून विषयांची साठवणूक करायची आणि अनेक विषय एकाच महासभेवर ठेऊन विनाचर्चा मंजूर करून घ्यायचे हा महापालिकेत प्रघातच बनला असल्याचे बोलले जात आहे.