सव्वासात लाख रुपयांच्या बँकेच्या दोन माजी अधिकार्‍यांना शिक्षा

0

मुंबई – सुमारे सव्वासात लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेच्या दोन माजी अधिकार्‍यांना अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी चाळीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये जिग्नेश काासी आणि आश्‍विन पटेल यांचा समावेश असून ते दोघेही मालाडचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दंडाची रक्कमेपैकी पन्नास हजार तक्रारदार खातेदाराला तसेच उर्वरित तीस हजार रुपये सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जिग्नेश आणि आश्‍विन हे दोघेही मालाड येथे राहत असून एचडीएफसी बँकेत अधिकारी पदावर काम करीत होते. मात्र त्यांनी बँकेत काही फसवणुक केल्याचे उघडकीस येताच त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांनी एका व्यापार्‍याचे बँकेत खाते उघडून दिले होते. ललित जोगनपूत्रा असे या व्यापार्‍याचे नाव आहे. या व्यापार्‍याला त्यांच्या दैनदिन कामासाठी धनादेशची आवश्यकता असल्याची माहिती या दोघांनाही होती. त्यामुळे या दोघांनी त्यांच्या धनादेशची चोरी करुन बोगस स्वाक्षरी तसेच बोगस बँकेचे लेटरहेडच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून 7 लाख 36 हजार रुपयांचा अपहार केला होता.

हा प्रकार नंतर ललित जोगनपूत्रा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बँकेला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी अंधेरी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच जिग्नेश आणि आश्‍विन या दोघांनाही पंधरा वर्षांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध अंधेरीतील न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. गेल्या पंधरा वर्षांपासून या गुन्ह्यांची सुनावणी सुरु होती. ही सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. यावेळी न्यायालयाने या दोघांनाही दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांच्या कारावासासह चाळीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.