ससून रुग्णालयामध्ये दिव्यांगांना चेअरचे वाटप

0

पुणे । दिव्यांगत्व हे नैसर्गिक असून त्या व्यक्तीला आधार देणे ही आपली सामाजिक तसेच नैतिक जबाबदारी आहे. दिव्यांग व्यक्ती तसेच जे रुग्ण समाजातील गरीब घटकांतील आहेत. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहचविण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले. ससून सर्वोपचार रुग्णालयात खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 8) दिव्यांग व्यक्तींना हँडीकॅप चेअरचे वाटप जि.प सदस्य रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजी कचरे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक अभिजीत अनाप, ससून रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता अजय चंदनवाले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्ष वैशाली नागवडे, पुणे मनपा चे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, ससूनचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे, औंध रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. भगवान शेळके, पुणे शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष राकेश कामठे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, दिव्यांग व्यक्ती हजर होते.

पवार म्हणाले, आरोग्याचे प्रश्‍न घेऊन काम करत असताना जाणवलं कि अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. इतर गोष्टींपेक्षा आरोग्य ही महत्वपूर्ण बाब असून त्याची काळजी घेणे आवश्यक ठरते. समाजातील सर्व थरांमधील लोकांसाठी सरकारी रुग्णालय ही संजीवनी असून तिथे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक ठरते.