महंमदवाडी । प्रभाग क्र.26मध्ये सातवनगर परिसरात डुकरांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हडपसर क्षेत्रिय कार्यालयात मोकाट डुकरे सोडण्याचे आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक संजय घुले यांनी नुकताच दिला.
हांडेवाडी रस्त्यानजीक सातवनगरमध्ये वराहपालकाने शेकडो डुकरे आणून सोडल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हडपसर सहआयुक्तालय आरोग्यविभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही आरोग्यअधिकारी दखल घेत नसल्याने भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय घुले यांनी हडपसर सहआयुक्तालयात मोकाट डुकरे आणून सोडण्याचा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. यावेळी सातवनगरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय सातव, भाजप युवा नेते योगेश सुर्यवंशी, संजय भुजबळ, आशिष सातव, सातवनगरमधील सोसायट्यांचे पदाधिकारी संदीप नलावडे, वाघुले काका, प्रसाद सोनटक्के, राजू दुबल, शिवाजी वाघ, केशव खोत, रामकृष्ण पाठक, जयवंत वझे, पीजी गुप्ता उपस्थित होते.
एकही डुक्कर पकडलेले नाही
प्रभाग क्र.26 मधील मोकाट डुकरे पकडण्याचे कंत्राट खासगी संस्थेला देण्यात आले आहे पण या संस्थेने सातवनगरमधील एकही डुक्कर पकडलेले नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यावर वराहपालक त्यांना धमक्या देतात. तरी आठ दिवसांमध्ये सातवनगरमधील वराहपालकांवर कडक कारवाई करून येथील डुकरे उचलली गेली नाही तर ही मोकाट डुकरे हडपसर सहआयुक्तालयामध्ये सोडण्याचे आंदोलन करणार असल्याचे यावेळी घुले यांनी सांगितले. मुंढवा-केशवनगर येथे वराहपालकांकरिता सोसायटीचे आरक्षण असताना सर्व्हे नं.53मध्ये वराहपालकांना सोसायटीकरीता जागा देण्याचा विषयच येत नाही. तसा प्रयत्न जरी झाला तरी तीव्र आंदोलन करून तो हाणून पाडू असा खणखणीत इशारा यावेळी नगरसेवक घुले यांनी दिला.
डुकरांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी
घुले म्हणाले, सातवनगर परिसरात वराहपालकाने अनधिकृतरित्या शेकडो डुकरे काही महिन्यांपूर्वी आणून सोडली आहेत. या डुकरांनी विद्यार्थी, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरीक यांच्यावर हल्ला करण्याच्या घटना झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सातवनगरमधील विविध सोसायट्यांमध्ये आणि चाळींमध्ये आठ हजार नागरीक राहतात. मोकाट डुकरे महिला, विद्यार्थी, दुचाकीस्वार यांच्यावर धावून जातात, अनेकजण डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. पण आरोग्यविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.