सहकारी संस्था स्पर्धेतही भक्कम

0

भोर । सहकार हा ग्रामीण विकासाचा भक्कम पाया आहे. स्पर्धेच्या युगात श्रीमंतांना मोठ मोठ्या फायनान्स कंपन्या आणि बँका सहज कर्ज पुरवठा करतात; परंतु तळागळातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला केवळ सहकारी संस्थांच कर्ज पुरवठा करू शकतात. म्हणूनच स्पर्धेच्या युगातही सहकारी संस्था भक्कमपणे उभ्या रहाण्यासाठी कर्ज पुरवठ्या बरोबरच इतर लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू करणे ही काळाची गरज आहे, असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त व्यवस्थापक काशिनाथ दंडवते यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुण जिल्हा सहकारी बोर्ड मर्या. पुणे आणि राजतोरण को ऑप क्रेडीट सोसा.लि. नसरापूरच्या वतीने नसरापूर (ता. भोर) येथे आयोजित 64 व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे उद्घाटन आणि सार्वजनिक खासगी सहकारी संस्था भागिदारीदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात दंडवते बोलत होते. सहकारी बोर्ड पुण्याचे अध्यक्ष हिरामण सातकर, संचालक शिवाजी नाटंबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.पुण्याचे विभागीय अधिकारी सुदाम पवार, बाळासाहेब थोपटे, पुणे जिल्हा सह. बोर्ड पुण्याचे संयोजक अजय जाधव, युवराज भोसले, अशोक केदारी, राजतोरण को ऑप क्रेडीट सोसा लि. नसरापूर उपाध्यक्ष बबन कामठे, संचालक संजय जगताप, शाम दलाल तसेच भोर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव-सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भोर सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक अलका पवार-देसले म्हणाल्या की ग्रामीण भागात विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सचिव अतिशय प्रामाणिकपणे संस्थेचा कारभार चालवत आहेत, त्यामुळेच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना वेळोवेळी शेतीसाठी कर्ज उपलब्ध होत आहे; परंतु स्पर्धेच्या युगात संस्थांनी केवळ कर्ज वाटपावरच न थांबता सभासदांच्या विविध गरजा ओळखून त्यासाठीच्या योजना व सेवा व्यवसायाचा लाभ देण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, कार्यक्रमाप्रसंगी भोर तालुका वनखाते कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने बेलाच्या रोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष पंडीत गायवाड व सचिव लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक अशोक केदारी यांनी केले तर संजय जगताप यांनी आभार मानले.