एरंडोल । सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतिष पाटील यांची शहरातील एका विवाह समारंभात गळाभेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे. आम्ही राजकीय विरोधक असलो तरी वैयक्तीक संबध चांगले असल्याचे आमदार डॉ.सतिष पाटील यांनी सांगितले. एरंडोलचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश महाजन यांच्या पुतणीचा विवाह 27 मे रोजी होता. विवाहास सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. विवाह सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतिष पाटील व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते.
दोन्ही एकमेकांचे विरोधक असल्याने भेट चर्चेत
राज्यमंत्री पाटील भोजनस्थळी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते तर आमदार डॉ. सतिष पाटील माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व त्यांचे बंधू दुर्गादास महाजन यांचेशी चर्चा करीत बसले होते. वधू वरांना आशीर्वाद दिल्यानंतर दोन्ही नेते अन्य कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जात असतांना दोघांचीही समोरासमोर भेट झाली. त्यावेळी आमदार डॉ.सतिष पाटील व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तांदोलन करून गळाभेट घेतली. त्याच वेळी विवाह समारंभास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी गळाभेटीचा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला.
गळाभेटीचा क्षण मोबाईलमध्ये येवू शकला नाही त्यामुळे कार्यकत्यांनी पुन्हा गळाभेट घेण्याची विनंती दोन्ही नेत्यांना केल्यानंतर पुन्हा दोन वेळेस गळाभेट घेण्यात आली आणि उपस्थित पदाधिकार्यांनी टाळ्या वाजवून भेटीचे स्वागत केले. सद्यस्थितीत राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असले तरी शिवसेना सातत्याने शासनाच्या विरोधात भूमिका घेत आहे. जिल्ह्यात देखील युतीच्या नेत्यांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तर भाजप नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. जिल्हा बँकेत शेतकर्यांना कर्जासाठी होत असलेल्या त्रासाबद्दल मंत्री पाटील अत्यंत कडक शब्दात टीका करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील कर्जासंदर्भात आक्रमक भूमिका घेत आहे अशावेळी दोन्ही नेत्यांची झालेली गळाभेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये हास्याचे फवारे
आम्ही राजकीय विरोधक आहोत दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून टीका करीत असलो तरी आमचे वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असल्याचे आमदार डॉ. सतिष पाटील यांनी सांगितल्यानंतर उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांमध्ये हास्याचे फवारे उडाले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार डॉ.सतिश पाटील यांची विवाह समारंभात योगायोगाने झालेली गळाभेट मात्र राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चेसाठी कारणीभूत ठरत आहे.