पिंपरी-चिंचवड : महावितरण कंपनीच्या मोशी शाखा कार्यालयातील सहाय्यक अभियंता विक्रांत वरुडे यांची दोन वेळा झालेली बदली पुन्हा रद्द करून त्यांना मोशी कार्यालयातच रुजू करून घेण्यात आले आहे. वरुडे यांच्यावर मनमानी कारभार करणे, कर्मचारी व ग्राहकांना दमदाटी करणे, नियमित कामात दिरंगाई करणे, असे आरोप असताना त्यांना पुन्हा मोशी कार्यालयातच का रुजू करून घेण्यात आले? असा प्रश्न उपस्थित करत पिंपरी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने त्यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे. आपला आक्षेप नोंदविण्यासाठी पिंपरी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी बुधवारी महावितरणच्या भोसरी कार्यालयासमोर ढोल वाजवा आंदोलन केले. या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्क्षी, सचिव नितीन बोंडे, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, उपाध्यक्ष मनोज हारपळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ताकसांडे यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप
विक्रांत वरुडे यांच्यावर अनेक आरोप असल्यामुळे राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची वडगाव मावळ येथे बदली केली होती. पण स्थानिक विभागीय अधिकारी संजय ताकसांडे यांनी आपल्या अधिकार कक्षेत पुन्हा वरुडे यांची बदली बेल्हा येथे करून काही दिवसांनी त्यांना पुन्हा मोशी येथे आणून बसवले. त्यामुळे ताकसांडे यांच्या कार्यपद्धतीवरदेखील असोसिएशने प्रश्न उपस्थित केला आहे. वरुडे यांची बदली झाल्यावर मोशी विभागातील अनेक दप्तर चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. वरुडे यांच्या जागी सतीश कांदे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आर्थिक जोरावर वरुडे यांनी पुन्हा उर्जामंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पुन्हा मोशी शाखेत बदली करून घेतल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
पारदर्शी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह
विक्रांत वरुडे हे भ्रष्ट अधिकारी असून, मोशी शाखेत त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या सर्व प्रकाराला झोनल अधिकारी संजय ताकसांडेदेखील पाठीशी घालत आहेत. असेच प्रकार पुणे झोनमधील सर्वच शाखेत चालू आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांना या बाबत सर्व भ्रष्टाचाराची कागदपत्रे असोसिएशने दिली आहेत. तरीही शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, असे पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी सांगितले.