सोनई दलित हत्याकांड : नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल
नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा व 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दोषींकडून दंड वसूल केल्यानंतर त्यातील दहा हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला. मानवतेला काळिमा फासणार्यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही, असे न्यायाधीशांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावताना स्पष्ट केले. हा महत्वपूर्ण खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी लढविला होता. न्याय मिळाल्यानंतर धनवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. दलित समाजाच्या तरुणाचे सवर्ण समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून हे नृशंस हत्याकांड घडले होते. तरुणासह तिघांची मुलीच्या कुटुंबीयांनी नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे निर्घृण हत्या केली होती. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते, हत्या करण्यात आलेल्यांचे हात, पाय, धड हे ऊस कापण्याच्या कोयत्याने कापून ते कूपनलिकेत टाकले होते. एकास तर शौचकुपात बुडवून मारण्यात आले होते. ही फाशीची शिक्षा जातीच्या ठेकेदारांमध्ये भीती निर्माण करेल, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
काय होते नेमके हत्याकांड?
नेवासा तालुक्यातील सोनईजवळील गणेशवाडी येथे 1 जानेवारी 2013 रोजी प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले होते. गणेशवाडीची सवर्ण समाजातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात बीएडचे शिक्षण घेण्यासाठी राहात होती. तर मेहतर समाजातील सचिन सोहनलाल धारू हा याच संस्थेत सफाई कामगार म्हणून राहात होता. या दोघांत प्रेमप्रकरण निर्माण झाले होते. हा प्रकार मुलीच्या कुटुंबीयांना समजला असता, या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. सचिन धारू याला घरातील शौचकुप दुरुस्तीसाठी बोलावून घेत, त्याच्यासोबत आलेल्या संदीप राजू धनवार, राहुल कंडारे या तिघांचीही मुलीचे वडिल पोपट दरंदले, चुलते रमेश व प्रकाश विश्वनाथ दरंदले, भाऊ गणेश उर्फ प्रवीण दरंदले, मावसभाऊ संदीप कुर्हे, नातेवाईक अशोक फलके व कामगार अशोक नवगिरे यांची वस्तीवरील शौचकुपात बुडवून, तसेच कोयत्याने हात-पाय तोडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. परंतु, प्रसारमाध्यमांनी या खुनाला वाचा फोडल्यानंतर प्रशासकीय व पोलिस यंत्रणा हलली होती. सोनई पोलिसांनी या खुनाचा तपास पूर्ण केला होता. नेवासा अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु, काही सामाजिक संघटनांनी हा खून खटला नगर जिल्ह्याबाहेर चालविण्याची मागणी केल्यानंतर तो नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांच्या जोरदार युक्तिवादानंतर व साक्षी व पुरावे पहाता सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी मुलीचे वडील पोपट दरंदले, चुलते प्रकाश व रमेश दरंदले, आत्येभाऊ संदीप कुर्हे, ट्रॅक्टरचालक अशोक नवगिरे, भाऊ गणेश दरंदले यांना दोषी ठरवले होते. या आरोपींना आता मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
न्यायाधीश म्हणाले, जातीव्यवस्था एडस्सारखी पसरू नये!
हा बहुचर्चित खटला लढविणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. आरोपींचे हे कृत्य राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने त्यांनी पीडितांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड घडविण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून, सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. हे कृत्य खूपच निर्घृण आहे, असा युक्तिवाद अॅड. निकम यांनी केला होता. तर आपल्या समाजात जातीव्यवस्था एडस् या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचे भांडवल करणार्या व्यक्तींना वेळीच जरब बसावी, असे परखड मत हा निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी मांडले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
– बचाव पक्ष
* कमीत कमी शिक्षा व्हावी
* प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही
* मुलीच्या भावाचे वय कमी आहे
* मुलीच्या वडिलांनी साठी पार केली आहे
* गेल्या पाच वर्षांपासून आरोपी कारागृहात आहेत.
– फिर्यादी पक्ष
* दुर्मिळात दुर्मीळ गुन्हा, मृत्यूदंडच द्यावा
* 22 परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध
* कृत्याचे परिणाम ज्ञात, वयाचा प्रश्नच नाही
* घटनेनंतरही आरोपींना पश्च्याताप नाही
* मृत निशस्त्र होते, त्यांनी उद्युक्त केले नाही
प्रेम संबंधाचे नाटक पोलिसांनी रचले!
या प्रकरणामुळे गेल्या पाच वर्षांपासून आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मुलीचे प्रेमसंबंध वैगरे काही प्रकार नव्हता. पोलिसांनी हा बनाव रचला. आम्ही वरिष्ठ न्यायालयात धाव घेणार आहोत.
– शंकर दरंदले, आरोपीचा चुलत भाऊ