शिंदखेडा: महाराष्ट्र राज्य वीज महावितरण तसेच इतर वीज कंपन्या गेल्या काही वर्षांपासून वीज-मूल्याची दुप्पट दराने आकारणी करीत आहेत. सध्या कोरोनाच्या संकटकाळात अनेकांची कमाई कमी तर काहींची बंद झाली आहे. त्यामुळे एप्रिल २०२० पासून पुढे सहा महिन्यांपर्यंत ३०० युनिटपर्यंत ग्राहकांना सरसकट ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी ग्राहक पंचायतच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तसेच राज्यातील अन्य वीज वितरण कंपन्या गेल्या काही वर्षांपासून सहकार क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्रातील काही ग्राहकांकडून विजबिलाची वसुली काही कारणास्तव करू शकलेली नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची थकबाकी तशीच आहे. आता मात्र अनावश्यक वीज दरवाढ करून अन्य ग्राहकांकडून प्रत्यक्ष वीज वापर मूल्यापेक्षा दुप्पट दराने आकारणी करीत आहे. ‘कोरोना’ सारख्या सध्याच्या वैश्विक संकटकाळात अनेकांचे उद्योग, व्यापार बंद पडले. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ज्यांच्या नोकऱ्या टिकून आहेत, त्यांच्या पगाराची शाश्वती नाही. त्यामुळे अशा सर्व वर्गातील ग्राहकांसाठी एप्रिल २०२० पासून पुढे किमान सहा महिन्यांपर्यंत त्यांच्या मासिक वीज बिलापैकी ३०० युनिटपर्यंत कंपन्यांना देय असलेल्या रकमेवर सरसकट ५० टक्के सवलत सर्व ग्राहकांना देण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्रा.सी.डी.डागा, रविंद्र ठाकूर, संजय पारख, छाया पवार, योगेंद्र सनेर, जितेंद्र मेखे, प्रा.जी.पी.शास्त्री, प्रा.ए.वाय.बोरदे, माधवराव देसले, माजी प्राचार्य पी.व्ही.दिक्षीत, प्रा.भिमराव कढरे, विजया वाघ, ॲड.वसंत भामरे यांनी केली आहे.