पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह इतर प्रमुख सभांना गैरहजर राहणार्या नगरसेवकांना शिस्त लावण्यासाठी भाजपने ‘एक पाऊल पुढे’ टाकले आहे. महापालिका सभांच्या हजेरीपत्रकावर केवळ सही करून सभेला दांडी मारत, घरी जाऊन आराम करणार्या नगरसेवकांना यापुढे चाप बसणार आहे. महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन करणार्या भाजपने स्वच्छ कारभाराला प्राधान्य देण्यासाठी आधी नगरसेवकांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण सभेच्या दिवशी सभागृहात प्रवेश करताना आणि सभा संपल्यानंतर परत जाताना नगरसेवकांची हजेरी नोंदवली जाणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने नगरसेवकांचे थम्ब इम्प्रेशन आणि फेस रिडिंग घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. सरकारच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
नोंदीसाठी हजेरीपत्रकाची प्रचलित पद्धत
महापालिकेची सर्वसाधारण सभा व इतर विषय समित्यांचे कामकाज महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार केले जाते. या अधिनियमातील सभा संचालनाच्या जादा नियमामधील तरतुदीनुसार सभांचे आयोजन केले जाते. परंतु, या नियमांमध्ये सभांना उपस्थित राहणार्या नगरसेवकांची हजेरी नोंदविण्यासाठी स्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे सभांना उपस्थित राहणार्या नगरसेवकांची हजेरीपत्रकावर स्वाक्षरी घेऊन उपस्थितीची नोंद करण्यात येते. ही पद्धत राज्यभरातील इतर सर्व महापालिकांमध्ये सर्वमान्य आहे. मात्र, या पद्धतीचा गैरफायदा घेऊन काही नगरसेवक सभेच्या दिवशी हजेरीपत्रकावर सही केल्यानंतर घरी निघून जाणे पसंत करतात. प्रत्यक्षरित्या ते सभेच्या कामकाजात सहभागी होत नाहीत. केवळ आपली सभेला हजेरी दिसावी, म्हणून ते हजेरीपत्रकावर सही करतात. एवढेच नाही तर काही नगरसेवक तर सभांना उपस्थित न राहता प्रशासनावर दबाव टाकून हजेरीपत्रक आपल्या घरी मागवून घेतात आणि आपल्या नावापुढे सही करून उपस्थितीची नोंद करतात.
आमदार जगताप यांची सूचना
महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणार्या नगरसेवकांची बायोमेट्रिक आणि फेस रिडिंग पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, अशी सूचना व मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने त्यास मान्यता दिल्यानंतर यापुढे नगरसेवकांची हजेरी बायोमेट्रिक व फेस रिडिंग पद्धतीने घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
माहिती व तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात प्रभावीपणे वापर केला जात आहे. त्यानुसार, माहिती व तंत्रज्ञानाचा सभा कामकाजामध्ये वापर केल्यास कामकाजातील त्रुटी कमी करता येणे शक्य आहे. सर्वसाधारण सभेच्यावेळी नगरसेवकांची हजेरी नोंदविताना हजेरीपत्रकावर सही घेण्याऐवजी बायोमेट्रिक पद्धतीने सभेला येताना आणि जाताना थम्ब इम्प्रेशन आणि फेस रिडिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नगरसेवकांची उपस्थिती नोंदविल्यास सभेला निश्चित वेळेत उपस्थित राहणे प्रत्येक नगरसेवकाला अनिवार्य राहील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दोन वेळेची हजेरीच ग्राह्य
एका कामकाजाच्या दिवशी सभा एकापेक्षा अधिकवेळा तहकूब करण्यात आली असल्यास पहिल्या सभेपूर्वी आणि त्या दिवसाच्या शेवटच्या सभेनंतर अशा दोनही वेळा नगरसेवकांनी बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदविली असल्यास त्या दिवसाच्या सर्व सभांना संबंधित नगरसेवक उपस्थित असल्याचे मानले जाईल. या पद्धतीमुळे नगरसेवकांना सुलभ पद्धतीने सभागृहामध्ये उपस्थिती नोंदविणे शक्य होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेमधील सहभाग वाढणार आहे. तसेच महापालिकेचे बहुतांश निर्णयांवर विस्तृत चर्चा होऊन संमतीने विषय मंजूर केले जातील. त्यामुळे प्रशासनाने सर्वसाधारण सभेवेळी नगरसेवकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने थम्ब इम्प्रेशन आणि फेस रिडिंगने घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. सरकारच्या मान्यतेनंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. तोपर्यंत सभांना उपस्थित राहणार्या नगरसेवकांची हजेरीपत्रकावरच सही घेतली जाणार आहे.