सांगली । शेतकरी संपावर गेला तरी राज्य सरकारकडून शेतकरी हिताची भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत सर्वपक्षिय नेते, कार्यकर्त्यांनी गुरुवारी जेलभरो आंदोलन केले. बुधवारी या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बाचाबाची व मारहाणीचा प्रकार झाला होता. त्या पाश्वभूमीवर आंदोलन चिघळण्याची चिन्हे होती, मात्र आंदोलकांनी शांततेत निषेध व्यक्त केला तर पोलिसांनीही कालच्या अनुभवातून शहाणपण घेत नरमाईचे धोरण अवलंबले. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून सुटका करण्यात आली.
येथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली होती. शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे, माकपचे उमेश देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहर सुधार समितीचे ऍड. अमित शिंदे, काँग्रेसचे संतोष पाटील, कय्युम पटवेगार, सतीश साखळकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, करीम मेस्त्री, शंकर पुजारी, विकास मगदूम, अश्रफ वांकर, आशिष कोरी आदींनी आंदोलन सहभाग घेतला.
काल पोलिस उपाधीक्षकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करणार्या उमेश देशमुख यांनी सुरवातीला आक्रमक पवित्रा घेतला, मात्र आंदोलनाचा मुख्य हेतू पोलिसांना टार्गेट करण्याचा नाही, याचे भान राखत सार्यांनी त्यांना रोखले. पोलिसांनीही नरमाईची भूमिका घेत आंदोलकांशी सुसंवाद राखला. त्यामुळे कोणत्याही तणाव आणि ताणाताणीशिवाय आंदोलन पार पडले. अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी स्वतः हजर राहून दक्षता घेतला. उपाधीक्षक धीरज पाटील यांच्यासह फौजफाटा तैनात होता.
वकिलांची निदर्शने
शेतकरी संपाच्या आंदोलनावेळी बुधवारी ऍड. सुधीर गावडे आणि ऍड. अमित शिंदे यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील वकील रस्त्यावर उतरले. विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सांगली वकील संघटनेने निषेधाचा ठराव केला. शेतकर्यांच्या संपाला पाठींबा जाहीर केला. त्यानंतर स्टेशन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. मारहाण प्रकरणी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे, उपाध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव प्रदीप जाधव ज्येष्ठ वकील के. डी. शिंदे, श्रीकांत जाधव, हरीष प्रताप, सुरेश भोसले, सुनीता मोहिते, अर्चना उबाळे, सुनेत्रा रजपूत आदींनी सहभाग घेतला.