राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून वाढत्या महागाईचा निषेध
सांगवी : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी सांगवी परिसरात बैलगाडीतून ’अच्छे दिनची गाजर यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी राज्य व केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
बैलगाडून दुचाक्यांची मिरवणूक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, श्याम जगताप, लाला चिंचवडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. बैलगाडीतून दुचाकी नेत अनोख्या पद्धतीने पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. ’अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेलं 80 पार’’ असे फलक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतले होते. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅसच्या किमतीदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्येदेखील भरमसाठ वाढ झाली आहे. केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी सांगितले.