सांगवी : केंद्र शासनाने 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता जुन्या पाचशे, हजाराच्या नोटा चलनात रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर नोटा बदलून घेणे, बँकेतून मर्यादित रक्कम काढणे अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागले. देशातील काळा पैसा बाहेर येईल. या उद्देशाने नागरिकांनी गैरसोयीचा सामना केला. होणारा त्रास संयमाने सहन केला. पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मशिनची तोडफोड केली.
नागरिकांची त्रास सहन केला
केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. घरात लग्न कार्य असताना, स्वत:च्या खात्यातून गरजेपुरती रक्कमही काढता येत नव्हती. रुग्णालयाचे बिल अदा करण्यास अडचणी आल्या. रांगेत उभे राहून कधी चार हजार तर कधी दोनच हजार रुपये मिळत होते. अशा सर्व अडचणी येत असताना सरकारने घेतलेला निर्णय हा नागरिकांच्या हिताचा असणार, या उद्देशाने नागरिकांनी बँक व्यवहारावेळी होणारा सर्व त्रास सहन केला.
जमावाकडून तोडफोड
नोटाबंदीनंतरची ही अडचणीची परिस्थिती कधीच दूर झाली आहे. आता केवळ बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या निष्काळजीपणाने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शनिवार, रविवार बँकांचे कामकाज बंद. त्यामुळे नागरिक सोमवारचा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. शनिवार, रविवार दोन्ही दिवस एटीएममध्ये खडखडाट होता. सोमवारीसुद्धा एटीएममध्ये खडखडाट जाणवल्याने संतप्त नागरिकांनी अक्षरश: सांगवीतील एटीएम मशिनची तोडफोड केली. एटीएमची तोडफोड करून जमाव निघून गेल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांना माहिती मिळाली, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जमलेल्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.