सांगवीमध्ये काढली प्लास्टिक बंदीची वारी

0

गुरुनानक हायस्कूलतर्फे राबविला उपक्रम

सांगवी- जनता शिक्षण संस्था संचालित येथील ब्लॉसम इंग्लिश मिडियम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व एस.जे.एच. गुरुनानक हायस्कूल यांच्यावतीने शनिवारी ‘प्लास्टिक मुक्ती’ ची वारी काढण्यात आली. आजच्या काळात प्लास्टिकचा वाढलेला वापर व भविष्यातील समस्या याविषयी विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशालेच्यावतीने या वारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केला होता. वारीचा मार्ग साई चौक, कृष्णा चौक, फेमस चौक असा होता. हे बाल वारकरी ‘प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा…’ या सारख्या घोषवाक्याचा गजर करीत होते.

विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती या विषयावर विविध पोस्टर व भित्तीचित्रांद्वारे लोकांना जनजागृती केली. तसेच यावेळी स्वतः तयार केलेल्या कागदी पिशव्यांचे वाटपही करत होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वृषाली पलांडे यांनी प्लास्टिकचे तोटे यावर माहिती सांगितली. तर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बादशाह तबस्सूम यांनी आपली शाळा प्लास्टिकमुक्त शाळा करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. अशा आगळ्या वेगळ्या शाळेतील वारीने विद्यार्थ्यांच्या चेहरा भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. कार्यक्रमाचे नियोजन प्रियंका लोमटे, सागर झगडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले.