भुसावळ । सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन साकेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे यांनी केले. वांजोळा जिल्हा परिषदेत शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेत मराठी शाळा वांजोळा येथे शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत वांजोळाचे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश फेगडे, उपसरपंच देविदास सावळे, ग्रामपंचायत सदस्या संगिता तायडे, शोभा पाटील, मंगला भिल, अॅड. हरेश पाटील, रविंद्र मोरे, भागवत मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी दिली दहा हजाराची देणगी
सरस्वती पूजनानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामिण भागातील चिमुकल्यांनी कलागुणांची उधळण केली. कार्यक्रमाची सुरुवात ‘देवा श्री गणेशा’ या गाण्याच्या नृत्याने झाली. मल्हार वारी, वाजले की बारा आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. वुई लर्न इंग्लिश व चिकन लिकन ह्या इंग्रजी नाटीकांना प्रेक्षकांनी दाद दिली. यावेळी गावातील लोकांनी कार्यक्रमास सुमारे 10 हजार रुपये देणगी दिली. कार्यक्रमाचे आकर्षण अपंग विद्यार्थीनी हर्षाली कैलास सावळे (कर्णबधीर) व शाळाबाह्य विद्यार्थी वयानुरुप दाखल झालेले गुरलाल व अजय ठाकुर यांनी सहभाग घेतल्याने ग्रामिण स्तरावरुन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
गटशिक्षणाधिकारी विजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुख्याध्यापिका उषा सोनवणे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन संदीप शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला धांडे, उषा सोनवणे, संदीप शेंडे, सुभाष पारधी यांनी परिश्रम घेतले. आभार सुभाष पारधी यांनी मानले.
पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता
विद्यार्थिनींसाठी याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शिक्षकांसह पालकांनी देखील आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणसोबतच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेतल्यास त्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास होत असतो. यातूनच व्यक्तीमत्व विकसीत होऊन या विद्यार्थ्यांमध्ये एक सुजाण नागरिक निर्माण होत असल्याचे सांगितले.