साईडपट्यांची तात्पुरती मलमपट्टी वाहन चालकाच्या जीवावर

0

एरंडोल। रा ष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस जीवघेणे होत चालले आहे. राष्ट्रीय महामार्ग सहावर आज पर्यत शेकडो निष्पापांना महामार्गावर आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गाची झालेली दयनिय अवस्था अपघात होण्यास सर्वाधिक कारणीभुत आहे. महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांची मागणी अनेकांनी लावुन धरली आहे. महामार्गावरील साईडपट्याची कायमस्वरुपी दुरुसती करण्यात येत नसून माती मिश्रीत मुरुम टाकुन साईडपट्टे बुजण्याचे काम सध्या एरंडोल राष्ट्रीय महामार्गावर सुरु आहे. साईडपट्याची तात्पुरती मलमपट्टी ही वाहन चालकासाठी धोकेदायक ठरत आहे. माती मिश्रीत मुरुममध्ये वाहनाचे चाक रुतत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. कायमस्वरुपी उपाय करण्यात यावी अशी मागणी एरंडोल शहरातील नागरिकांमधुन होत आहे.

पावसाळ्यात होणार चिखल
पावसाळा तोंडावर असुन महामार्गावरील साईडपट्टयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. साईडपट्टासाठी माती मिश्रीत मुरुम वापरले जात असल्याने पावसाळ्यात साईडपट्टे पुन्हा नादुरुस्त होणार आहे. माती मिश्रित नित्कृष्ठ दर्जाच्या मुरुमामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

खर्च जाणार व्यर्थ
राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यामुळे रस्त्यालगत सुमारे एक ते दोन फुट खोल खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. साईडपट्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. पावसाळ्यात मुरुम वाहुन जाणार असल्याने प्रशासनातर्फे करण्यात येणारा लाखोचा खर्च व्यर्थ जात आहे.

रास्तारोको करण्यात आला
एरंडोल परिसरातल नागरिकांनी साईडपट्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन यापूर्वी केलेला आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. ठेकेदार अधिक लाभ मिळवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे मुरुम वापरत आहे. प्रशासनातील अधिकार्‍यांनी संबंधीत ठेकेदारास चांगल्या दर्जाची मुरुम वापरण्याचा आदेश द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.