शिर्डी । साई संस्थानच्या वतीने साईबाबा समाधी दर्शनासाठी येणार्या पायी पालख्यांच्या प्रतिनिधींचे संमेलन 14 जूनरोजी सिध्द संकल्प मॅरेज हॉल येथे आयोजित करण्यात आलेे असून सर्व पालखी मंडळांनी नावे संस्थानच्या संरक्षण विभागाकडे नोंदवावीत असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केले. डॉ.हावरे म्हणाले, साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येतात. मुंबई, पुणे, नाशिक, शहापूर, भिवंडी, औरंगाबाद, अहमदनगर, जळगांव, धुळे आदी ठिकाणाहून व इतर राज्यांच्या कानाकोपर्यातून वर्षभर शेकडो पदयात्री पालख्या घेवून शिर्डीत येत असतात. यापैकी अनेकांनी संस्थानकडे सेवेची विनंती केलेली आहे.
शेगावच्या धर्तीवर साईसेवक योजना
शेगांवच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर साईसेवक योजना राबविण्याचा संस्थानचा मानस असून साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने संस्थानला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. यामुळे पालखी सोबत येणार्या पदयात्री भाविकांना साईसेवक हा सन्मान देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
21 जणांचे गट तयार करणार
पालखीसोबत येणार्या साईभक्तांनी 21 व्यक्तींचा गट तयार करुन नोंदणी संस्थानकडे करावी. या गटामध्ये 20 सदस्य व 1 प्रमुख राहील गटाला वर्षातून फक्त 7 दिवस सेवा करण्याची संधी दिली जाईल. सुमारे 10 हजार 500 साई सेवकांची मदत साईबाबा समाधी शताब्दी वर्षात होणार असून ही सेवा करण्याचा पहिला मान पालखी सोबत येणार्या पदयात्री भाविकांना देण्यात येईल. ही सेवा साईसेवकांनी मोफत द्यायची आहे. संस्थानच्या वतीने साईसेवकांची निवास, भोजन, नाष्टा व चहापाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल.
नावनोंदणीचे आवाहन
सर्व पालखी भक्त मंडळांनी आपली नावे साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाकडे कार्यालयीन वेळेत 02423-258885 या दुरध्वनी क्रमांकावर नोंदवावीत. अधिक माहितीसाठी संरक्षण अधिकारी मधुकर गंगावणे मो.नं.7720077288, विलास कोते मो.नं. 9049727215 व योगेश गोरक्ष मो.नं. 9970235007 या क्रमांकांवर संपर्क साधावा.