साई मार्केटींगला काळ्या यादीत टाका

0

जळगाव। जिल्ह्याभरातील शाळांना पुरविण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आढळून आले. निकृष्ट पोषण आहारासंबंधी शिक्षणमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली. विधीमंडळात लक्षवेधी देखील लावण्यात आली आहे. निकृष्ट पोषण आहार पुरवठा होत असल्याने पुरवठादार साई मार्केटींगला काळ्या यादीत टाकून या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी व शासनस्तरावरून चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. पोषण आहार प्रकरणी मंगळवारी 25 रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. यावेळी आमदार संजय सावकारे, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, सचिव नंदकुमार, संचालक सुनिल चव्हाण, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तक्रारदार रविंद्र शिंदे यांची उपस्थिती होती.

चुकीचा अहवाल
पोषण आहार प्रकरणी यापुर्वी संचालकस्तरावरून चौकशी करण्यात आली मात्र कोणत्याही शाळांना भेटी न देता चुकीचा अहवाल देण्यात आल्याचे आढळून आले आहे. शंभर टक्के आहार चांगला असल्याचा अहवाल दिल्यानंतरही शाळांना पुरविण्यात आलेले आहार निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शासनस्तरावरूनच चौकशी समिती नेमावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली.

प्रशासनाकडून माहीती
शिक्षण मंत्र्यांनी सीईओ कौस्तुभ दिवेगावकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडून पोषण आहारांसर्भात माहिती घेतली. अधिकार्‍यांनी शासनाकडून व जिल्हा परिषद स्तरावरून झालेल्या पत्र व्यवहाराची माहिती घेतली घेतली.