साकळीचे ग्रामदैवत भवानी मातेचा 18 रोजी यात्रोत्सव

0

शेकडो वर्षांची परंपरा ; दोन दिवस बारागाड्यांचा उत्सव चालणार
यावल:- तालुक्यातील साकळी येथे सालाबादप्रमाणे यंदाही अक्षयतृतीयेनिमित्त बुधवार, 18 पासून ग्रामदैविक भवानी मातेचा यात्रोत्सव भरत असून यात्रोत्सावानिमित्त ग्रामदैवतेच्या नावाने दोन दिवस बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. भवानी माता मंदिरा समोर बुधवारी भगत समाधान पाटील, चुंचाळे हे बारागाड्या ओढणार आहेत तर दुसर्‍या दिवशी गुरूवारी ग्रामदैवत भागरता माता मंदिराजवळून भगत कैलास केशव बडगुजर हे बारागाड्या ओढतील. दोन्ही दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता होईल. सलग दोन दिवस बारागाड्या ओढण्याची फार जुनी धार्मिक परंपरा आहे.

भवानी मातेची आख्यायीका
साकळी येथील भोनक नदीच्या तीरावर प्राचीन व जागृत असे भवानी मातेचे मंदिर होते. भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणार्‍या आई भवानीचे हे मंदिर जिल्हाभरात जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. भवानी मातेचे हे मंदिर पूर्वी साध्या बांधणीचे शेडचे होते. काही वर्षापूर्वी भोनक नदीस महापूर आला होता. त्यावेळी या महापूरात देवीचा बाणा वाहून गेला. तत्कालीन सरपंच स्व.आसाराम पाटील यांच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देवून सांगितले की, बारागाड्यांच्या मदतीने नदीत जमलेल्या गाळाची नांगरटी केल्यास त्याठिकाणी माझा बाणा सापडेल. त्यानुसार स्व. आसाराम पाटील यांच्यासह गावातील नागरिकांनी गाड्या जूंपून नांगरटीस सुरुवात केली तेव्हा पहिल्याच फळात देवीचा बाणा वर आला. नागरीकांनी वाजत-गाजत त्या बाणाची विधीवत पुजा करून त्याची मंदिरात स्थापना केली.

काही दिवसानंतर वाणी समाजाचे स्व. पंडीत उखर्डू वाणी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जयपूर येथून भवानी मातेची संगमरवरी दगडाची मूर्ती आणून मंदिरास दिली. ही मूर्ती आणण्यासाठी स्व. पंडीत नेवे यांचे बंधू लक्ष्मण उखर्डू नेवे यांनी जयपूर येथे गेले होते. त्या काळी वाहनांची सुविधा नसल्यामुळे नेवे यांनी देवीची वजनदार मूर्ती डोक्यावर घेऊन पायी चालत जयपूर रेल्वे स्टेशन गाठल्याचे जुने जाणकार सांगतात. मूर्ती आणल्या नंतर होम हवन पुजा करून विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून चैत्रोत्सव व नवरात्रोरत्सव हे उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. अक्षयतृतीयेच्या दिवशी देवीच्या नावाने बारागाड्या ओढल्या जातात. दानशूर व्यक्तींच्या मदतीने भवानी मातेच भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. यात्रेनिमित्त दोन्ही दोन्ही दिवस ग्रामदैवतेची पूजा केली जाते तर दर्ग्यावर चादर चढविली जाते. यात्रा बघण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी जिल्हाभरातून भाविक येथे येत असतात व भवानी मातेचे दर्शन घेतात.