साकळीतील चिमुकलीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

0

आरोग्य विभागाची धाव : ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छता करण्याबाबत पत्र

यावल- तालुक्यातील साकळी येथील महाजन वाडा भागातील शेतमजूर शालीक धोंडू पाटील यांची द्वितीय कन्या पूजा शालीक पाटील (वय 9) हिचा अतिसारामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. रात्री उशिरा तिच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या गंभीर घटनेनंतर आरोग्य प्रशासन खळबडून जागे झाले असून रविवारी सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे व चमूने गावाला भेट दिली. गावातील स्थानिक आरोग्य विभागाने गावातील पाचशे घरांचे सर्वेक्षण केले असून ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेसंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

महाजनवाड्यात पसरली शोककळा
पूजा पाटीलची शनिवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडल्यानंतर तिला उलट्यांसह शौचाचा त्रास सुरू झाला. तत्काळ खाजगी डॉक्टरांकडे उपचार केल्याने बरे वाटले मात्र दुप9ारी पुन्हा पुजाची प्रकृती खराब झाली. यावल येथे उपचारार्थ हलवत असताना रस्त्यातच दुपारी तिचा मृत्यू झाला. तिला अतिसाराचा त्रास झाल्याचे सांगितले. मृत पूजाची लहान बहीण प्रतीक्षा हिलाही असाच त्रास होत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. पूजा ही जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत तिसरीत शिक्षण घेत होती. तिच्यावर शनिवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोग्य विभागाची साकळीत धाव
अतिसाराने चिमुकलीचा बळी गेल्यानंतर आरोग्य विभाग खळबडून जागा झाला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे यांनी गावातील भेट देत पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व कर्मचार्‍यांनी गावातील 500 घरांचे सर्वेक्षण केले. गावातील महाजन वाडा, मास्तर वाडा, सैय्यद वाडा या भागात गटारी तुंबल्याचे पथकाला आढळले. येथे स्वच्छता करण्याची सूचना ग्रामविकास अधिकार्‍यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आली तर उर्दू हायस्कूलजवळील तुंबलेले चेंबर तसेच लोधी वाड्यासह जैन मंदिराजवळील व्हॉल्व्ह लिकेज दुरुस्ती करण्याची सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे.