ग्रामस्थांचा संताप ; कोरमअभावी सभा रद्द
यावल- तालुक्यातील साकळी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त घेण्यात येणारी ग्रामसभा काही तांत्रिक अडचणीमुळे घेता न आल्याने गुरुवार, 17 रोजी घेण्याचे ठरले मात्र कोरमअभावी ग्रामसभा तहकूब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील गटारींच्या समस्यांसह इतरही मुलभुत समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले होते. तथापि अनेक ग्रामसभा तहकूब होण्याची परंपरा कायम असतांना ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या बंदीस्त सभागृहात न घेता गावातील सुरक्षीत अशा मोकळ्या जागेत घेतली जावी अशी मागणीही जोर धरत आहे. 1 मे रोजीची सभा काही तांत्रिक अडचणी मुळे 17 मे रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्याचे ठरले होते. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व काही माजी पदाधिकारी व ग्रामस्थ कर्मचारी मिळून आकडा पन्नाशीपर्यंत न पोहोचल्याने व नागरीकांचा कोरम पुर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकुब केली जात असल्याचे ग्रामविकास अधिकारी डी.आर. निकुंभ यांनी सांगितले.
खुल्या जागेत ग्रामसभा घ्यावी
जन जागृतीसाठी ग्रामसभेचे कामकाज लोकांपर्यंत पोहचण्यासाठी खुल्या जागेत ग्रामसभा घेण्यात यावी. ग्रामसभा तहकुबीची परंपरा केव्हा खंडीत होणार व ग्रामस्थ आपल्या समस्या केव्हा मांडणार ? ग्रामसभेला उपसरपंच हजर न राहण्याचे कारण काय ? असा प्रश्न ग्रामपंचायतीचे मा सदस्य राजू गजमल सोनवणे यांनी उपस्थित केला.
सभा होत नसल्याने समस्या मांडायच्या कुठे ?
माझ्या राहत्या घरासमोर गेल्या दहा वर्षापासून गटारीचे सांडपाणी वाहत आहे तर घराजवळील एक रस्ता मोकळा करण्याचा एक प्रश्नही गंभीर आहे. या समस्या मासिक सभेतही मांडूनही सुटत नाही. ग्रामसभेत घ्यायचे म्हटले तर ग्रामसभा त्या तहकुब होतात. मग आमच्या नागरी समस्या मांडायच्या कुठे ? सदरील समस्या न सुटल्यास माझे वडील देवमन चौधरी (वय 101) हे उपोषणास बसतील, असा इशारा ग्रामस्थ सुरेश देवमन चौधरी यांनी दिला.