साकळीत ग्रामसभेला गालबोट ; दोन गट भिडल्याने ग्रामपंचायतीवर दगडफेक

0

चारचाकी वाहनाचे नुकसान ; एक जण जखमी ; यावल पोलिसांची धाव

यावल- ग्रामसभा सुरू असताना भिन्न समाजाच्या तरुणांनी एकमेकांकडे पाहिल्यानंतर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन दंगलीत होवून दोन्ही समाजाच्या तरुणांनी दगडफेकीसह लाठ्या-काठ्यांचा मारा केल्याने एक जण जखमी झाला तर चारचाकी वाहनाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी तालुक्यातील साकळी येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर यावल पोलिसांनी धाव घेत गावात शांतता प्रस्थापीत केली. आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली असून शांतताप्रिय गावात वारंवार होणार्‍या अप्रिय घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

ग्रामसभेतच उफाळला वाद
26 जानेवारीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात ग्र्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते तर याचवेळी दोन समाजातील तरुणांनी एकमेकांकडे पाहिल्यानंतर त्यांच्यात वाद उफाळला. पाहता पाहता हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन समाजातील तरुण एकमेकांवर धावून आले तर यावेळी लाठ्या-काठ्यांसह सर्रास दगडांचा वापरही करण्यात आला.

चारचाकी फोडली, टीव्हीचेही नुकसान
साकळी सरपंच सुषमा विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परीषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ, उपसरपंच वसीम खान, जितेंद्र महाजन, दीपक पाटील, विलास पाटील ग्रामसेवक डी.आर. निकुम आदींच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू असताना हिंसक जमावाने दगडफेक सुरू करताच स्वतःचा बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह पदाधिकार्‍यांनी स्वतःला ग्रामपंचायतीत कोंडून घेतले. तेव्हा जमावाने तेथून ग्रामपंचायतच्या मागे अक्सा नगरात मोर्चा वळवला व तेथे वायरमन गोपाल सुभाष चौधरी यांच्या चारचाकी (एम.एच.02 जे.पी.9788) ची तोडफोड करण्यात आली तसेच ग्रामपंचायतीमागील रहिवासी नरेश गिरधर महाजन यांच्या घरातील टीव्ही दगडफेकीत फुटला तसेच जमावाने दरवाजाचा कडीकोयंडाही तोडला. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून त्यास तातडीने जळगावात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. साकळीतील अप्रिय घटनेची माहिती कळताच यावलचे पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी, उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे पथकासह दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले असून गावात तणावपूर्ण शांतता असून वाढीव बंदोबस्त बोलावण्यात आला आहे.