साकळीत घरे फोडली : एक लाख 30 हजारांच्या ऐवजावर डल्ला

यावल : शौकीन चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घरात आधी मिलिट्रीची दारू रीचवली नंतर काजू, बदामाच्या चकणा खाल्ला व नंतर दोन घरांमध्ये चोरी करून सुमारे 30 हजारांच्या रोकडसह दिड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना तालुक्यातील साकळी येथे घडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

बंद घरांना केले टार्गेट
साकळी, ता.यावल येथे सोमवारी दोन बंद घरात घरफोडी झाल्याची बाब उघडकीस आली. साकळी गावातील नेवे गल्ली, बारसे वाडा भागातील माजी सैनिक भास्कर चिंधु नेवे हे गेल्या आठवड्यापासून लग्नानिमित्त नातवाईकांकडे गेले होते. चोरट्यांनी संधी साधत कपाटातील 30 हजारांची रोकड तसेच एक लाख 20 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे लांबवले. नेवे हे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, हवालदार चंद्रकात पाटील आदी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली तसेच गावातील कुंभार वाडा भागातील अवसु झावरू कुंभार यांच्या बंद घरात देखील घरफोडी झाल्याची बाब उघडकीस आली आहे. धान्याच्या कोठीतील एक हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली.