चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून कुरूळी, मुर्हेवस्ती, मोई गावाकडे जाणार्या रस्त्याची व साकव पुलांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या परिसरातील वाहन चालकांसह प्रवासीवर्ग हैराण झाले आहेत. या रस्त्याने प्रवास करणे अतिशय अवघड झाले आहे. खेड तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून मोई गावांकडे जाणार्या रस्त्यावर जड मालवाहू गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. या रत्स्याचे संपुर्ण डाबंरीकरण व खडीकरण उखडले असल्याने मातीचा फुफाटाच सगळीकडे उधळत आहे.
पुलाचे संरक्षक अँगल तुटले
या रस्त्याचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपुर्वी करण्यात आले होते. त्यानतंर फक्त डागडुजी करण्यात आली. ती सुध्दा दोन-तीन महिन्यात उखडली गेली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे चारचाकी वाहने आत्ता या रस्त्यावरून बंद पडत आहे. येथील ग्रामस्थांना चिंबळी फाटा येथे जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर मुर्हेवस्ती येथील साकव पुलाचे संरक्षण लोखंडी अँगल तुटले आहे. या ठिकाणी रस्ता ही अरूंद झाल्याने चारचाकी वाहने नेताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व साकव पुलांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसंरपच मारूती मुर्हे, आशिष मुर्हे, सतीष मुर्हे आदींनी केली आहे.