दोन वेळा घरीदेखील केला होता आत्महत्येचा प्रयत्न ; वैफल्यग्रस्त अवस्थेतून उचलले पाऊल
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव जवळील चैतन्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकणार्या पूजा अरुण पाटील (20, पहुरकसबे, ता.जामनेर) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. नृत्य व अभिनयाची आवड असतानाही मनाविरुद्ध मेडिकलमध्ये प्रवेश घ्यावा लागलयाचे शल्य पूजाच्या मनात होते त्यामुळे यापूर्वी दोन वेळा तिने घरीदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नव्हते. सुट्या असतानाही लवकर ती हॉस्टेलमध्ये आली व तिने मंगळवारी मृत्यूला कवटाळले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सहा ते सात पानांची चिठ्ठी लिहिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मुळात करीअर करायचे नव्हते तर गाण्यासह नृत्य व अभियनाची आपल्याला सुरुवातीपासून आवड होती व त्यातच करीयर करण्याचा मनोदय तिने चिठ्ठीत लिहिला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. विद्यालयाचे क्लर्क चंद्रकांत नारायण पाटील यांनी तालुका पोलिसात खबर दिल्यावरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक सचिन खामगड अधिक तपास करीत आहेत.