राष्ट्रवादीचा विभाग नियंत्रकांना निवेदनाद्वारे इशारा
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथे मध्यम व लांब पल्ल्याच्या बसेसला येत्या आठ दिवसात थांबा न मिळाल्यास राष्ट्रीय महामार्गावर बसेस अडविण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य, शिक्षण समिती सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी जळगाव राज्य परिवहन विभाग नियंत्रकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
भुसावळ तालुक्यातील महामार्गावरील साकेगाव येथून दररोज भुसावळ व जळगाव येथे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ विविध कामांसाठी येणे जाणे असते मात्र अनेक बसेसला थांबा नसल्याने प्रवाशांना तास न तास बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागते. या संदर्भात 2015 मध्ये निवेदन दिल्यानंतर तेव्हा साकेगाव बसस्थानकावर एस.टी.बसेस थांबवण्यात येतील अशा प्रकारचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर फक्त दोन ते तीन महिन्यांपर्यंत एसटी बसेस थांबल्या मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत गेल्या तीन वर्षात कमी-अधिक प्रमाणात या बसेसचा थांबा होऊ लागला. आता तर फक्त लोकल बस सोडल्या तर अन्य कोणत्याही बसेस साकेगावला थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ बसस्थानकावर उभे राहावे लागत आहे. त्यातच बसस्थानकाची दुरावस्था झाल्याने पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागते. यामुळे भुसावळ व जळगाव येथे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मध्यम व लांब पल्ल्याच्या बसेस साकेगाव बसस्थानकावर थांबवण्यात याव्या अन्यथा येत्या आठ दिवसात साकेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसेस थांबवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
महामंडळ विभागीय नियंत्रक प्रमुख राजेंद्र देवरे व जिल्ह्याचे वाहतूक नियंत्रक प्रमुख घुले यांना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद रवींद्र नाना पाटील यांनी निवेदन दिले. प्रसंगी बोदवड नगरपालिका गटनेते देवेंद्र खेवलकर उपस्थित होते.